ऐरोली मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई

ऐरोली मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई
Published on

ऐरोलीमध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई
वाशी, ता. ९ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात ऐरोली विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत ऐरोली सेकटर चार येथे एच. ७० मध्ये प्रदीप यादव यांचे बांधकाम नवी मुंबई महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे करण्यात आले होते. या अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम अंतर्गत नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविले नसल्याने महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई केली. या धडक मोहिमेसाठी ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी सुनील काठोळे, कनिष्ठ अभियंता संदीप म्हात्रे, जी विभाग ऐरोली येथील अधिकारी-कर्मचारी तसेच अतिक्रमण पोलिस पथक उपस्थित होते. या मोहिमेकरीता एक गॅस कटर, दोन हॅमर व आठ मजूर यांचा वापर करण्यात आलेला आहे.
....................
आयुक्‍तांकडून आरोग्यकर्मींना विविध सूचना
नेरूळ (बातमीदार) ः जागतिक आरोग्य दिनाची या वर्षीची संकल्पना निरोगी सुरुवात आणि आशादायक भविष्य ही असून त्यास अनुसरून निरोगी सुरुवातीच्या दृष्टीने शून्य ते चार वयोगटातील बालकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे सांगत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बालमृत्यू व गरोदर माता मृत्यू यांचे प्रमाण शून्य करण्यासाठी गरोदर मातांचे व त्यांची काळजी घेणाऱ्या कुटुंबियांचे प्रबोधन करावे असे सांगितले. नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात आयोजित विशेष समारंभ प्रसंगी आयुक्तांनी उपस्थित डॉक्टर्स, नर्सेस व वैद्यकिय कर्मचारी यांना जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच आरोग्य विभागामार्फत चांगले काम सुरू असल्याचे यावेळी सांगितले. याप्रसंगी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे तसेच महापालिकेच्या तिन्ही रुग्णालयांचे वैद्यकिय अधिक्षक व पदव्युत्तर पदवी वैद्यकिय शिक्षण संस्थेचे प्रमुख व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी भारतातील बालके व गरोदर माता मृत्यूप्रमाण आणि लसीकरण याची आकडेवारी सांगत नवी मुंबईमधील स्थिती या बाबत सर्वोत्तम राहिल हे लक्ष्य ठेवून काम करण्यास सांगितले. या दृष्टीने नागरिकांशी दैनंदिन थेट संबंध येणाऱ्या आशा सेविका तसेच एएनएम यांची जबाबदारी मोठी असल्याचे सांगत यांचेमार्फत प्रबोधन व्हावे व निरीक्षण ठेवण्यात यावे अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
...........
काँक्रीटीकरणामुळे दिघावासीयांना मिळणार दिलासा
वाशी (बातमीदार) ः दिघा गाव रेल्वे स्थानकासमोरील मुकुंद कंपनी जवळील चौकामध्ये दरवर्षी मान्सूनमध्ये पाणी साचते. त्‍यामुळे गुडघ्याभर पाण्यातून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. मात्र यंदा नवी मुंबई महापालिकेकडून मुकुंद कंपनी येथील चौकाचे काँक्रीटीकरणासह ईश्वर नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे रहिवाशांना यंदाच्या मान्सूनमध्ये दिलासा मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मुकुंद कंपनीच्या चौकामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात. तर या ठिकाणी पाणीदेखील साचून राहते. त्यामुळे वाहनचालक व पादचारी यांना खड्डयातून प्रवास करावा लागतो. तर दरवर्षी पावसाळ्यात नवी मुंबई महापालिकेकडून येथील चौकाला डांबरीकरणाचा मुलामा देऊन काम भागविले जाते. त्यामुळे नागरिकांकडून दर पावसाळ्यात पालिकेच्या नावाने ओरड केली जाते. अखेर यंदा पालिकेने या ठिकाणी रस्त्याचे काँक्रीटकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार टीडब्ल्युटी या आधुनिक पद्धतीने रस्त्याचे व मुकुंद कंपनीच्या चौकाचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. पालिकेकडून अडीच कोटी रुपये खर्च करून हे काम केले जात आहे. तर शासनाच्या मुलभूत निधीमधून एक कोटी रुपये खर्च करून ईश्वर नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचेदेखील सिमेंटीकरण करण्यात येत आहे.
..............
खैरवाडी येथे "जॉय कॅम्प" चे आयोजन
पनवेल (बातमीदार) ः सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता आणि जबाबदारी निर्माण करण्याच्या हेतूने, इन्फिनिटी फाउंडेशन आणि पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, न्यू पनवेलच्या फॅशन डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने खैरवाडी, पनवेल येथे जॉय कॅम्प चे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमधून समाजातील वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबवले गेले आणि स्थानिक नागरिकांना आनंदाचे क्षण अनुभवता आले.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आणि स्वयंसेवकांनी चित्रकलेसाठी आवश्यक किट्सचे वाटप करून लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेतली. ज्यामुळे मुलांच्या सृजनशीलतेला वाव मिळाला. याशिवाय पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मातीपासून गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. ज्यात मुलांनी आनंदाने सहभाग घेतला. गरजू नागरिकांसाठी कपडे व अन्नाचे वितरण करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात आले. तसेच परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून हरित पनवेलचा संदेश दिला गेला. या विशेष उपक्रमासाठी पिल्लई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन वाडेर, उपप्राचार्या दीपिका शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे व इन्फिनिटी फाउंडेशनच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजाभिमुख दृष्टिकोन विकसित होतो, असे प्रतिपादन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com