पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्ती कामांना वेग

पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्ती कामांना वेग
Published on

पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्ती कामांना वेग
कल्याण, ता. १० (वार्ताहर) : कल्याण आणि भांडुप परिमंडळात वीज वितरण यंत्रणेच्या पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे जलद गतीने सुरू आहेत. या कामांमुळे पावसाळापूर्व वादळवारा व मॉन्सूनच्या सुरुवातीला खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची तीव्रता कमी होण्यास मदत मिळेल. संबंधित भागातील वीजग्राहकांना पूर्वकल्पना देणारे संदेश त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून त्या-त्या भागात देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. या कामांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

देखभाल-दुरुस्तीच्या कामातून वीज वितरण यंत्रणेची कार्यक्षमता व जीवनमान वाढण्यास मदत होते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साधारणत: एप्रिल आणि मेमध्ये वीज वितरण यंत्रणेची कामे केली जातात. त्यानुसार कल्याण आणि भांडुप परिमंडळात यावर्षी तापमानाचा पारा चाळीशी पार झाला आहे, असे असतानाही महावितरणचे कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि कंत्राटदार (एजन्सी) कामगारांनी रणरणत्या उन्हात देखभाल-दुरुस्तीची कामे केली आहेत. देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी विभागनिहाय इनपॅनलमेंट एजन्सीची (कंत्राटदार) नियुक्ती केली आहे. महावितरणचे नियमित कर्मचारी, बाह्यस्रोत (कंत्राटी) कामगार आणि एजन्सीच्या कामगारांकडून एकत्रितपणे देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत.

मोबाईलवर संदेश
देखभाल व दुरुस्तीच्या कामांत वीज वितरण रोहित्र (डीपी), उपकेंद्र तसेच उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांची कामे तसेच वीज वितरण यंत्रणेत अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येते. सर्वेक्षणानंतर आवश्यक कामांची निवड करून स्वयंचलित एनडीएम प्रणालीत संबंधित काम व भागांची माहिती भरण्यात येते. त्यानुसार संबंधित भागातील वीजग्राहकांना प्रणालीमार्फत वीज बंद ठेवण्यात येणाऱ्या कालावधीबाबत पूर्वकल्पना देणारे संदेश त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com