पनवेल पूरपरिस्थितीच्या सावटाखाली

पनवेल पूरपरिस्थितीच्या सावटाखाली
Published on

वसंत जाधव : सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १० : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीसाठी आठ मीटर भराव करण्यात आला आहे. त्यामुळे आजूबाजूचा परिसर हा नैसर्गिकदृष्ट्या खाली राहिला आहे. याशिवाय नालेसफाई व्यवस्थित होत नाही. नदीच्या पात्रालगत अतिक्रमण करण्यात आले आहे. कांदळवनाचा ऱ्हास झाल्याने पावसाच्या पाण्याला अटकाव करता येत नाही. याव्यतिरिक्त इतर अनेक कारणांमुळे पनवेल शहर आणि सिडको वसाहती पूरसदृश परिस्थितीच्या सावटाखाली आहेत. याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना गेल्या काही वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे आगामी काळात पनवेल महापालिका क्षेत्र पाण्याखाली जाण्याचा धोका अधिक निर्माण झालेला आहे.
मुंबई आणि कोकणचे प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेलला महानगराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावांमध्येही नागरीकरण वाढलेले आहे. त्यामुळे साहजिकच या भागाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. २०१६ला पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पनवेलच्या नागरिकांना एक विस्तारित स्वरूप प्राप्त झाले आहे. याव्यतिरिक्त बाजूलाच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आले आहे. जून महिन्यामध्ये या ठिकाणी विमान टेकऑफ करणार आहे. हजारो हेक्टर जमिनीवर सिडकोने आठ मीटरचा भराव केला आहे. आजूबाजूच्या टेकड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. ती माती आणि दगड विमानतळाच्या सपाटीकरणांमध्ये वापरण्यात आले. त्याचबरोबर गाढी नदीचे पात्र बदलण्यात आले आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात कांदळवन संपुष्टात आले. यामुळे पावसाच्या पाण्याला अटकाव करण्यासाठी अडचणी व अडथळे निर्माण होतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पनवेल शहरासह सिडको वसाहतींच्या सखल भागामध्ये पाणी साचत आहे. या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. बैठ्या घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान होत आहे. नद्यांच्या पात्रातील पाणी बाहेर येऊन परिसर जलमय होतो. या सर्व गोष्टींचा विचार करण्यात येत नाही. त्यामुळे पनवेल परिसरावर पुराची टांगती तलवार सातत्याने राहत आहे.

---------------
२६ जुलैच्या कटू आठवणी
पनवेल आणि इतर वसाहती नैसर्गिकदृष्ट्या खाली राहिलेल्या आहेत. याशिवाय कळंबोली समुद्रसपाटीपासून साडेतीन मीटर खाली आहे. या कारणामुळे सखल भागामध्ये पाणी साचते. २५ आणि २६ जुलै २००५ला पनवेलसह नवीन पनवेल, खांदा कॉलनी त्याचबरोबर कळंबोलीत आणि पनवेल शहरांमध्ये पाणी शिरले होते. पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आल्याने अतिशय दयनीय अवस्था झाली होती. तळमजल्यावरील अनेकांचे संसार आणि दुकाने वाहून गेली. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. केवळ जीवितच नाही तर वित्तहानीसुद्धा पनवेल परिसरामध्ये झाली. त्या कटू आठवणी दरवर्षी पावसाळ्यात जाग्या होतात.
--------------
कळंबोलीतील भय संपत नाही
सिडकोने काही जुजबी उपाययोजना केल्या असल्या तरी आजही कमी पावसामध्ये कळंबोली परिसरात पाणी साचत आहे. विशेषकरून जुलै महिन्यात कॉलनी पूर्णपणे जलमय होते. बैठी घरे आणि दुकानांमध्ये पाणी जाऊन सातत्याने नुकसान होते. पनवेल महापालिकेने आता सिडको वसाहती आपल्या ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या अपुऱ्या पडत आहेत. या कारणामुळे परिसर जलमय होत आहे.
--------------
वरवरची नालेसफाई, जलधारण तलावात गाळ
सिडको वसाहतीमध्ये जे पावसाळी नाले आहेत त्यांची फक्त चेंबरच्या खालीच सफाई केली जाते. पुढचा गाळ, माती आणि कचरा तसाच राहतो. नाल्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या, त्याचबरोबर बाटल्या मोठ्या प्रमाणात असतात. मोठ्या पावसाळी नाल्यामध्ये कचरा टाकला जातो. त्याचबरोबर जलधारण तलावामध्ये गाळ साचल्याने पावसाचे पाणी पुन्हा वसाहतीमध्ये शिरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com