

वाणगाव, ता. १० (बातमीदार) : विवाह समारंभ, साखरपुडा, हळदी समारंभ, धुळवड, गणेशोत्सव, गोकुळाष्टमी या कार्यक्रमात ग्रामीण भागात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या ढोल, सनई, टिमकी; तसेच धनवाद्ये, तंतूवाद्य, चर्मवाद्य आणि सुषिरवाद्य, संस्कृती जपणारी ही पारंपरिक वाद्ये नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या लोककलेचे जतन करून संस्कृती जपण्याच्या उद्देशाने रामनवमीनिमित्त गुरुकुलात रामनामाचा जागर करण्यात आला. या वेळी पारंपरिक वाद्यांच्या सुरात कोकणातील सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील भजनी कलाकारांनी गुरुकुल शिक्षण संकुलात साद घालत रामभक्तांना भजनात तल्लीन केले.
कोकणात भजन, कीर्तन, शक्ती तुरा, नमन अशा पारंपरिक लोककला अजूनही जिवंत आहेत. ज्या ठिकाणी वयोवृद्ध मंडळी आहे तेथे अशा कला जोपासल्या जातात. हे कोकणाला मिळालेले एक प्रकारचे लेणं आहे. तरुणाईचा ओढा जरी डीजे, बॅन्जो, बॅण्ड याकडे असला, तरी कोकणी कलाकारांनी आपल्या परंपरेचे जतन केले आहे. बोईसरचे ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक नामदेव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने आणि नियोजनाने भजनी मंडळाचे आयोजन गुरुकुल संकुलात करण्यात आले होते. या वेळी ४००हून अधिक संकुलातील लहान थोर, वयोवृद्ध मंडळी, महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोककलेचा आनंद लुटला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष संस्थापक मधुकर पाटील, विश्वस्त मानीनी पाटील, संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील, उपाध्यक्ष विकास पाटील, सचिव विलास राऊत, वित्त संचालक लूमेश देसाई, विश्वस्त अपर्णा देसाई, सहसचिव अक्षय पाटील, विश्वस्त विशाखा राऊत, रुशाली पाटील, सोनालिका पाटील, वेदांत राऊत, विधी राऊत उपस्थित होते.
पूर्वी लग्न समारंभात, वरातीत, हळद समारंभात, गावातील राजकीय मिरवणूक टिमकीशिवाय जल्लोष साजरा केला जात नसे. त्याची जागा आता आधुनिक वाद्यांनी घेतल्याने पारंपरिक लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ही कला अखंड टिकून राहावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- विग्नेश सावंत, ढोलकी व पखवाज वादक, सिंधुदुर्ग
पूर्वी मोठ्या प्रमाणात पूजा, वास्तुशांती व इतर घरगुती कार्यक्रमांमध्ये भजन, कीर्तन असे पारंपरिक चर्मवाद्यांच्या सानिध्यात कार्यक्रम होत असत. त्या वेळी ढोलकी, भजनी पेटी, टाळ, झांज अशा वाद्यांना वयोवृद्ध व्यक्तींकडून पसंती होती; परंतु सध्याच्या नवतरुण मंडळींना यामध्ये रस नाही. त्यांना डीजे, बेन्जो, ढोलपथकाच्या तालावर थिरकायला आवडते. त्यामुळे ही कला लुप्त होत आहे. तरुणांनी लोककलेचे जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- अमोल लाड, हार्मोनियम वादक, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.