

पनवेल, ता. १० (बातमीदार) : पनवेल शहर, सिडको वसाहतींसह ग्रामीण भागात लावण्यात आलेले फलक, फ्लेक्स, होर्डिंग यांच्या परवानगीद्वारे पालिकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक कोटी ५३ लाख २३ हजार ७९१ रुपये उत्पन्न मिळाले आहे. फलकांपासून उत्पन्न मिळावे, यासाठी पालिकेने राबविलेल्या धोरणामुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडण्यासह शहराचे विद्रूपीकरण रोखण्यास मदत झाली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रासह पनवेल शहरामध्ये होर्डिंग, बॅनर लावण्यासाठी पालिकेने जागा निश्चित केल्या असून, यासाठी अगोदर अर्ज करून पैसे भरून क्यूआर कोड प्राप्त करून घेऊनच बॅनर लावावे लागणार आहेत. विनापरवाना व विना क्यूआर कोड बॅनर आढळून आल्यास संबंधितांविरोधात गुन्हा नोंद केला जाणार आहे. यासाठी घरबसल्याही परवानगी ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकतो. तशी सुविधा पालिकेने केल्याची माहिती पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली. बॅनर लावण्यासाठी महापालिकेने शहरात एकूण १७५ जागा निश्चित केल्या आहेत. यासाठी १५ रुपये प्रतिचौरस फूट प्रतिदिवस जाहिरात भाडे पालिकेकडून निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या महसुलात वाढ झाली आहे.
----------------
अशी आहे प्रक्रिया
पनवेल पालिका क्षेत्रात फलक लावण्यापूर्वी संबंधितांना पालिकेची परवानगी घ्यावी लागते. फलकाचा आकार, त्यावरील मजकूर व इतर बाबींची पडताळणी केल्यानंतर कालावधीनुसार कर आकारणी करत त्याबाबतचा क्यूआर कोड पालिका संबंधितांना देते. यासाठी पूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येत होता; मात्र आता पालिकेने त्यासाठीची ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे.
----------------
स्ट्रक्चरल ऑडिटच्या सूचना
घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सर्वच ठिकाणी त्याबाबतच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येऊ लागल्या. पनवेल पालिकेनेही शहरातील विविध ठिकाणच्या होर्डिंगधारकांना स्ट्रक्चरल ऑडिटसह इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पाहणीअंती धोकादायक असणारे काही होर्डिंग पालिकेने संबंधितांना सांगत त्या ठिकाणाहून हटवत सर्वसामान्यांना होणारा धोका कमी केला आहे.
-----------------
पनवेल पालिका क्षेत्रामध्ये परवानगी घेऊन फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग लावण्यासाठी १७५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने त्यासाठी लागणारे शुल्क भरून नागरिकांनी पालिका क्षेत्रात बॅनर लावावेत अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
- रविकिरण घोडके, उपायुक्त, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.