

गावदेवी मैदानावर ‘चैत्रोत्सव’
ठाणे : विश्वास सामाजिक संस्था, ऋणानुबंध आणि सारथी यांच्या वतीने ठाण्यातील गावदेवी मैदानात ‘चैत्रोत्सव बहर खरेदीचा’ या गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाला सुरुवात झाली आहे. भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या वतीने भरविलेल्या महोत्सवात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, भाजपच्या नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वाघुले, कोकण पदवीधर प्रकोष्ठचे संयोजक सचिन मोरे, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत कळंबटे उपस्थित होते. गावदेवी मैदानात १६ एप्रिलपर्यंत होणाऱ्या महोत्सवात विविध गृहोपयोगी वस्तूंचे १०० हून अधिक स्टॉल्स आहेत.
---------------------------------
उल्हास नदीतील जलपर्णीची पाहणी
ठाणे ः उल्हास नदीतील जलपर्णीचा वापर करून महिला बचत गटांमार्फत भेटवस्तू तयार करण्याच्या उद्देशाने म्हारल, कांबा, वरप येथे जलपर्णीची पाहणी करण्यात आली. या वेळी म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये उमेदअंतर्गत असलेल्या महिलांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. जलपर्णीपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू महिलांना दाखविण्यात आल्या. महिलांना रोजगारनिर्मितीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अंबरनाथ तालुक्यातील ढोके दापिवली, साई ग्रामपंचायतींच्या नदीवर देखील प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेण्यात आली. या भेटीदरम्यान प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्यासह गट विकास अधिकारी, प. स. कल्याण संजय भोये, जिल्हा अभियान व्यवस्थापक सारिका भोसले, कृषी अधिकारी, तालुका अभियान व्यवस्थापक आदी उपस्थित होते.
--------------------------------------
१३४ जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण
ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे कार्यलयामार्फत ‘समता पंधरवडा’निमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत राबवलेल्या विशेष मोहिमेत १३४ जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण उपायुक्त प्राची वाजे, पोलिस उपअधीक्षक प्रभाकर घाडगे व पोलिस निरीक्षक पुष्पलता दिघे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे विद्यार्थी व पालक यांनी कौतुक करून समिती अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
----------------------------
बेकायदा हुक्का पार्लरवर कारवाई
ठाणे ः हुक्का पार्लरच्या आड चालणाऱ्या बेकायदा धंद्यांवर ठाणे पोलिस दलाकडून कारवाई करण्यात येत आहे. याच अनुषंगाने ठाणे शहरामध्ये जानेवारी २०२५ पासून आजपर्यंत तीन बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापे टाकून कोटपा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ठाणे शहरामध्ये तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मॉल्स, कॅफे आणि हँग आऊट्स येथे विशेष गस्त व गुप्त तपासणी सुरू आहे. अशा ठिकाणी होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश स्थानिक पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. तसेच बेकायदेशीर प्रवृत्तींवर ‘झीरो टोलरन्स’धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे पुढील काळातही अशा हुक्का पार्लरवर कारवाईची मोहीम सुरू राहणार असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्तांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.