

कोसले येथे क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम
कल्याण (वार्ताहर) : तालुक्यातील कोसले येथे नुकताच आत्मा योजनेअंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळ कृषी अधिकारी भगवान पथारे यांनी केली. कार्यक्रमासाठी डॉ. नामदेव म्हसकर प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत यांनी एकात्मिक शेती पद्धती तसेच सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी आत्मा प्रकल्प उपसंचालक मनाली तांबडे यांनी नैसर्गिक शेती तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन जनजागृती कार्यक्रमाविषयी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. वैशाली भापसे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी सूत्रसंचालन केले. कृषी सहाय्यक गेरसे यांनी जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यानंतर पंतप्रधान सूक्ष्म, अन्न प्रक्रिया योजनेत सहभाग घेतलेल्या यशस्वी उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी कोसले सरपंच दिलीप पालवी, गेरसे सरपंच शरद दिवाणे, कृषी पर्यवेक्षक विजय पाटील, खडवली पोलिस पाटील विलास पालवी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन रामेश्वर पाचे व कुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
.....................
ठाकरे गटाच्या कल्याण शहरप्रमुखपदी बाळा परब
कल्याण (वार्ताहर) : ज्येष्ठ शिवसैनिक व माजी परिवहन सदस्य कृष्णा ऊर्फ बाळा परब यांची शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्यालयातून या नियुक्तीची घोषणा झाली आहे. बाळा परब यांची कल्याण पश्चिम विधानसभा शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेनेच्या मुख्य कार्यालयात बाळा परब यांनी पदभार स्वीकारला. कल्याणकर शिवसैनिकांच्या प्रेमाने तसेच उपनेते विजय साळवी यांच्या सहकार्यामुळे आपली नियुक्ती झाल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले. कल्याण शहरात ठाकरे यांची शिवसेना झपाट्याने वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
.............
उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कल्याण पंचायत समितीला भेट
टिटवाळा (वार्ताहर) : सर्वसामान्य ग्रामस्थांच्या तक्रारी व अडचणींचे तातडीने निवारण व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेने १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत तालुका सुविधा समिती योजना राबवली आहे. या उपक्रमाअंतर्गत गुरुवारी (ता. १०) जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) अविनाश फडतरे यांनी कल्याण पंचायत समितीला भेट देत ग्रामस्थांच्या समस्या ऐकल्या अन् त्यांचे निराकरण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या या उपक्रमानुसार भिवंडी, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ आणि कल्याण या पंचायत समित्यांना वरिष्ठ अधिकारी भेटी देत आहेत. त्यानुसार अविनाश फडतरे यांनी कल्याणमध्ये ग्रामस्थ व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी उपस्थित खातेप्रमुख व कर्मचाऱ्यांना तालुका सुविधा समिती योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमात कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, सहाय्यक गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी, बांधकाम उपअभियंता महाडिक, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम जयकर, पशुसंवर्धन अधिकारी धांडे तसेच विविध खात्यांचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.......................
डॉ. दिनेश गुप्ता यांचे विशेष व्याख्यान
कल्याण (वार्ताहर) : बटण आधारित मोबाइलवरून आपण अँड्रॉइड मोबाइलकडे अन् काळ्या आणि पांढऱ्या टेलिव्हिजनवरून स्मार्ट टीव्हीकडे वळलो आहोत. जग बदलत आहे. मुलांकडेही स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे आता आम्हा शिक्षकांनाही आपल्या शिकवण्याच्या पद्धती बदलाव्या लागतील, असे मत माइंडसेट गुरू प्रोफेसर डॉ. दिनेश गुप्ता यांनी व्यक्त केले. तारापूर विद्या मंदिरात शिक्षकांना मार्गदर्शन केले. जीवनदीप पब्लिकेशन्सच्या सहकार्याने कौशल्य विकास आणि नवोपक्रम या विषयावरील विशेष शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सुमारे ४७ शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्राचार्य जॉन, समन्वयक मनीषा चव्हाण आणि पर्यवेक्षक चौधरी यांच्या विशेष देखरेखीखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. हे तीन तासांचे विशेष सत्र होते, जे नवीन विकसित अध्यापन पद्धती, मानसिकता, विशेष प्रयोग, नावीन्यपूर्णता आणि समग्र विकासाने भरलेले होते.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.