

कारावमध्ये बेकायदा जीन्स कारखाना
कल्याण, ता. १० (बातमीदार) : अंबरनाथ तालुक्यातील काराव गावात बेकायदा जीन्स धुलाईचा कारखाना सुरू असल्याचे या ग्रामपंचायतीच्या एका धक्कादायक अहवालावरून उघड झाले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला हा अहवाल दिला होता. तसेच हा अनधिकृत कारभार गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून, कारखान्यातील रासायनिक पाणी नजीकच्या शेतात एक मोठा हौद खणून सोडले जात आहे. यामुळे नजीकच्या जलस्रोतांमध्ये खराब पाण्याचा अंश आढळले आहेत.
वालधुनी नदीचे पाणी कायमस्वरूपी काळे केल्यानंतर आता ग्रामीण भागात पोहोचलेले जीन्स धुलाईचे कारखाने ग्रामीण भागातील नैसर्गिक जलस्रोतांच्या मुळावर उठले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील वांगणी या गावापासून जवळ असलेल्या काराव या गावात एक जीन्स धुलाई कारखाना २०२२ पासून बेकायदा सुरू आहे. या ग्रामपंचायतीने स्वतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केलेल्या अहवालात ही गंभीर बाब उघड केलेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पाणी अडगळीच्या जागी शेतात १२ फूट खोल खड्डा खणून सोडले जाते, असा खुलासाही या अहवालात केला आहे. दरम्यान, या कारखान्याबाबत विधानसभेच्या २०२३ च्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सत्ताधारी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर, आमदार योगेश सागर यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना जीन्स धुलाई कारखाना ग्रामपंचायत हद्दीत सुरू असल्याची कबुली तेव्हा ग्रामपंचायतीने तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली होती; मात्र त्यानंतरही त्यावर कारवाई झालेली नाही.
अहवालात नेमकं काय?
२०२३ मध्ये या कारखान्याबद्दल विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यानंतर एक अहवाल काराव ग्रामपंचायतीने ९ जानेवारी २०२४ मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला होता. या अहवालात नमूद केल्यानुसार, काराव येथील गट क्रमांक ११ यात ९६ गुंठ्यांवर तीन पत्र्यांचे गाळे आहेत. त्यातील एकात कामगार राहतात, तर दुसऱ्यात जीन्स धुलाईचे काम केले जाते, तर तिसऱ्या गाळ्यात पँट सुखवणे आणि पॅकिंगचे काम केले जाते. याच जागेत ३० फूट बाय ४० फूट आणि १२ फुट खोल असे दोन खड्डे खोदले आहेत. त्यात दूषित पाणी साठवले जाते. गंभीर बाब म्हणजे ग्रामपंचायतीने हे दूषित पाणी खड्ड्यात साठवले जात असल्याबद्दल कोणताही आक्षेप घेतलेला नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग
उल्हासनगर रेल्वेस्थानकानजीक वालधुनीच्या किनारी जे जीन्स धुलाई कारखाने पूर्वी होते, ते जर सुरू करायचे असतील, तर त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जावा, असे सर्वोच्च न्यायालयाने ते कारखाने बंद करताना आपल्या आदेशात म्हटले होते; मात्र काराव इथे कोणताही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू न करता या अनधिकृत कारखान्याला इतके दिवस काम सुरू कसे ठेवू दिले, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यायाने काराव इथे न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वीजपुरवठा सुरळीत
ग्रामीण भागात सुरू असलेल्या अशा कारखान्यांबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला विचारले असता, आम्ही अशा कारखान्यांवर लगेच कारवाई केली आहे; मात्र आमच्या कारवाईनंतर महावितरणकडून त्यांना वीजपुरवठा सुरू राहिल्याने असे कारखाने पुन्हा सुरू होतात, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.