

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १० : डिजिटल युगात सायबर गुन्हे झपाट्याने वाढत आहेत. सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्ट फ्रॉड नावाची नवीन फसवणुकीची पद्धत शोधून काढली आहे. या फसवणुकीच्या प्रकारात सायबर गुन्हेगार पोलिस, सीबीआय, ईडी, न्यायाधीश अशा प्रकारचे सरकारी अधिकारी असल्याचे भासवून धमकावतात, त्यानंतर त्यांना पैसे देण्यास भाग पाडतात. अशा पद्धतीने सायबर गुन्हेगारांनी अनेकांना डिजिटल अरेस्ट केल्याचे भासवून त्यांच्या या फसवणुकीला बळी पडलेल्या लोकांकडून कोट्यवधीची रक्कम लुटली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकच अधिक बळी पडत आहेत. वसई-विरार मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तालय क्षेत्रातदेखील सायबर गुन्हेगारी डोके वर काढत आहे. गेल्या तीन महिन्यांत नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे.
आधुनिक जगात नागरिक छोट्या-मोठ्या वस्तू खरेदीपासून ऑनलाइन ट्रेडिंग, गुंतवणूक, तसेच समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तींसोबत मैत्री करणे आणि त्यातून हनी ट्रॅपला बळी पडणे, मेहनतीने जमा केलेले जमापुंजी परिचित नसलेल्या व्यक्तीला देतात. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक तक्रारी विविध पोलिस ठाण्यात येत आहेत. डिजिटल अरेस्ट हा सायबर गुन्ह्यातील एक प्रकार असून, यामध्ये फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार एखाद्या व्यक्तीशी पोलिस, सीबीआय, ईडी, न्यायाधीश अथवा इतर सरकारी विभागातील अधिकारी असल्याचे भासवून संपर्क साधतात. त्यानंतर ते समोरील व्यक्तीला ते मनी लाँड्रिंग, ड्रग्ज तस्करी किंवा सायबर फसवणूक गुन्ह्यात सहभागी असल्याचे भासवतात. त्याबाबतची बनावट कागदपत्रे पाठवून त्यांचा विश्वास संपादन करतात. तसेच व्हिडिओ कॉल आणि फसव्या ऑनलाइन न्यायालयीन सुनावणी सुरू असल्याचे भासवून समोरील व्यक्तींना अटक केल्याचे व झालेली अटक टाळण्यासाठी त्वरित पैसे जमा करण्यास भाग पाडतात.
अनेकदा भामटे फसवणूक केल्यावर मोबाईल बंद करणे, नंबर ब्लॉक करणे किंवा अन्य पर्याय शोधून पळून जातात. त्यामुळे त्यांना तांत्रिक शोधणे अवघड होते, तर वेगवेगळ्या लिंक मोबाईलवर येतात. आपण सहज उत्सुकतेने पाहतो, मात्र त्यानंतर आपली माहिती पूर्णपणे ही टोळी मिळवते आणि नंतर फसवणूक करते, तसेच ऑनलाइन कर्ज देऊन त्यानंतर आपली महत्त्वाची कागदपत्रे मिळवतात. वारंवार पैशाचा तगादा लावून पैसे उकळतात व ब्लॅकमेलिंग केले जाते. त्यामुळे या दबाव तंत्राला अनेक जण बळी पडतात. डिजिटल अरेस्ट अशा घटनादेखील वसई-विरार शहरात घडू लागल्या आहेत.
सायबर गुन्हे शाखेकडून कारवाईसाठी पावले उचलली जात आहेत. सायबर गुन्ह्याची नोंद झाल्यावर त्वरित ऑनलाइन फसवणुकीबाबत रक्कम गोठवलेली आहे. त्यामुळे रक्कम तक्रारदाराला परत मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही, असेही पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले.
फसवणूक कशी केली जाते?
फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार फोन कॉल, ईमेल किंवा व्हॉट्सॲप मेसेजद्वारे एखाद्या व्यक्तीशी विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना संपर्क साधतात. त्यानंतर त्यांचे नाव एका गंभीर गुन्ह्याशी जोडले गेल्याचे, तसेच लवकरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याची भीती दाखवतात. त्यानंतर सायबर गुन्हेगार बनावट सरकारी पत्रे, अटक वॉरंट पाठवून देतात. त्यांना घरामध्ये डिजिटल अरेस्ट केल्याचे भासवून त्याबाबत कुणाला काहीही न सांगण्याबाबत धमकावले जाते.
काही प्रकरणात तर पीडित व्यक्तींना व्हिडिओ कॉलद्वारे बनावट ऑनलाइन न्यायालयीन सुनावणीत सहभागी करून घेतले जाते. त्यानंतर कारवाई टाळण्यासाठी त्या व्यक्तींना जामीन किंवा सुरक्षा रक्कम जमा (डिपॉझिट) करण्यास सांगितले जाऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले जातात.
कोणती काळजी घ्यावी?
- त्वरित पोलिस ठाण्यात तक्रार देणे.
- १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
- ऑनलाइन तक्रार करावी.
- फसव्या संदेशापासून सावध राहणे.
- अनोळखी लिंक, संकेतस्थळ, मोबाईल ॲप डाऊनलोड करू नये.
- अनोळखी व्यक्तींनी संपर्क केल्यास वैयक्तिक माहिती देऊ नये.
- बँक व्यवहाराची दैनंदिन कमाल मर्यादा निश्चित करावी.
ऑनलाइन तक्रार कुठे करावी?
- https://cybercrime.gov.in/
- https://www.sancharsaathi.gov.in/
- https://sachet.rbi.org.in/Complaints/Add
जानेवारी ते मार्चदरम्यान गुन्हे
सायबर गुन्हे दाखल ४४
फसवणूक ३,२१,३०,१०८
आर्थिक फसवणूक २३
समाज माध्यमांसंदर्भात गुन्हे २१
अटक आरोपी ३
समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवता ऑनलाइन व्यवहार करू नयेत. फोनवरून सर्रासपणे प्रलोभने दिली जातात, तसेच लिंक पाठवली जाते. त्यामुळे याबाबत सावध राहावे. सायबर विभागाकडून नागरिकांमध्ये जागृती आणि फसवणुकीपासून सावध करण्यासाठी समाजप्रबोधन केले जात आहे.
- अविनाश अंबुरे, उपायुक्त, सायबर गुन्हे विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.