मुंबईकरांसाठी २३८ नव्या एसी लोकल

मुंबईकरांसाठी २३८ नव्या एसी लोकल
Published on

मुंबईकरांसाठी २३८ नव्या एसी लोकल!

रेल्वेमंत्र्यांची माहिती; लोकल, मेट्रो, बस प्रवासासाठी ‘मुंबई वन’ कार्ड

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास सुकर करणाऱ्या दोन मोठ्या घोषणा शुक्रवारी (ता. ११) करण्यात आल्या आहेत. मुंबईकरांच्या सेवेत २३८ एसी लोकल लवकरच दाखल होणार असल्याची घोषणा शुक्रवारी रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई वन कार्ड’ हे मल्टीमोडल स्मार्ट कार्ड महिनाभरात प्रवाशांना उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. रेल्वेमंत्री वैष्णव आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह महाराष्ट्रातील मंजुरी मिळालेल्या विविध रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली.

‘वन सिटी, वन कार्ड’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणून मुंबईकरांसाठी विकसित करण्यात आलेले ‘मुंबई वन कार्ड’ लवकरच सुरू होणार आहे. या कार्डद्वारे लोकल, मेट्रो, बेस्ट बस आणि अन्य सार्वजनिक वाहतूक साधनांतून प्रवास करता येणार आहे. या वेळी फडणवीस म्हणाले, की मुंबई वन कार्ड हे शहरातील प्रवासासाठी गेमचेंजर ठरणार आहे. यामुळे कनेक्टिव्हिटी वाढून प्रवास अधिक सुकर होणार आहे. रेल्वे मंत्रालय आणि पर्यटन विभाग एकत्रित १० दिवसांची विशेष ऐतिहासिक दौरा योजना राबवणार आहेत. यासोबतच १ मे ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईत ‘वेव्ह समिट’ आयोजित केला जाणार आहे. जगातील सर्जनशील आणि क्रिएटिव्ह क्षेत्रासाठी महत्त्वाचा मंच असलेल्या समिटमध्ये १०० देशांचे प्रतिनिधी आणि पाच हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. या समिटमुळे मुंबईचं नाव जागतिक नकाशावर झळकणार आहे.
दरम्यान, कोकण रेल्वे हे स्वायत्त मंडळ आहे. त्यामुळे नवीन स्थानक, दुहेरीकरणासाठी आवश्यक निधी उभारण्यात अडचणी येतात. त्यामुळे कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेत सामावून घेण्याबाबत गोवा सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारने रेल्वेमंत्र्याशी चर्चा केली, त्यास रेल्वेमंत्री सकारात्मक असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
‘मुंबईसाठी नव्या बांधणीच्या २३८ नवीन वातानुकूलित लोकल गाड्या आणल्या जाणार आहेत. या लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञान, अधिक आरामदायक आसन व्यवस्था, ऊर्जा बचतीसाठी स्मार्ट प्रणाली आणि सीसीटीव्ही यांसारख्या सुविधा असतील. सध्या या आधुनिक एसी लोकलचे डिझाइन तयार करण्यात येत आहे. मुंबईतील पावसाळ्यातील वारंवार होणाऱ्या वाहतूक खोळंब्यांचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. यात पॉइंट मशीन बदल, मायक्रो ड्रेनेज प्रणाली आणि दीड फूट पाण्यातही गाड्या चालतील, अशी यंत्रणा तयार करण्यात येत असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी या वेळी दिली.

केंद्र सरकारने नुकतीच १८,६५८ कोटी रुपयांच्या चार मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रासाठी यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे गोंदिया-बल्लारशहा रेल्वेमार्गाचे २४० किमी लांबीचे दुहेरीकरण. या प्रकल्पासाठी ४,८१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामुळे या भागातील प्रवासी व मालवाहतूक सेवा वेगवान होणार आहे.
- अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री

रेल्वे मंत्रालयाच्या या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागांतील कनेक्टिव्हिटी सुधारणार असून विदर्भ, छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील व्यापार व पर्यटनालाही चालना मिळणार आहे, असे फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर राज्यातील तब्बल १३२ स्थानकांचा पुनर्विकास एकाच वेळी सुरू आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यात २३ हजार ७०० कोटी रुपये रेल्वेच्या प्रकल्पांकरिता मिळाले आहेत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत पुन्हा चाचपणी
मुंबईच्या लोकलमधील एकाच दिशेने होणारी गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आहे. पूर्वी अनेक संस्थांनी याला विरोध केला होता; मात्र आता पुन्हा मंत्रालयस्तरावर त्याबाबत चाचपणी केली जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com