अभ्युदयनगर पुनर्विकास प्रकल्पाला गती

अभ्युदयनगर पुनर्विकास प्रकल्पाला गती
Published on

अभ्युदयनगर पुनर्विकास प्रकल्पाला गती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नव्याने निविदा काढण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : अभुदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्रफळ किमान ६२० चौरस फूट ठेवून त्यानुसार म्हाडाने नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ ६३५ वरून ६२० पर्यंत कमी करण्यास अभ्युदयनगर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनुकूलता दाखविली आहे.

अभुदयनगर येथील म्हाडाच्या वसाहतीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार यापूर्वी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र निविदेमध्ये पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्रफळ ६३५ चौरस फूट असण्याबद्दल प्रमुख अट होती. त्यामुळे त्याला विकसकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (ता. ११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी निविदेमध्ये पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र ६३५ चौरस फूट ऐवजी किमान ६२० चौरस फूट चटई क्षेत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच निविदेमध्ये ६२० चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ देणाऱ्या विकसकाचा विचार पुनर्विकासासाठी करण्याचे निर्देश दिले. या वेळी आमदार प्रवीण दरेकर, अजय चौधरी, माजी आमदार बाळा नांदगावकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह अभुदयनगर रहिवासी फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

भाड्यामध्ये वाढ करण्याचा विचार!
अभुदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन प्रकल्पासाठी पुनर्विकास विनियम ३३(५) नुसार लागू असलेल्या तीन चटई क्षेत्र निर्देशांक हा अधिमूल्याच्या मोबदल्यात गृहसाठ्याच्या स्वरूपात वितरित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. तसेच पुनर्विकासादरम्यान रहिवाशांना देण्यात येणाऱ्या २० हजार रुपये घरभाड्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com