थोडक्यात बातम्या नवी मुंबई
बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
उरण, ता. १२ (वार्ताहर) ः न्हावा-शेवा वाहतूक शाखेअंतर्गत चालू वर्षी जेएनपीए परिसरात विशेष मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण १० हजार ७०० वाहनचालकांविरुद्ध मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये कारवाई केली. या कारवाईअंतर्गत एकूण सहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये रस्त्यावर अवैध वाहने पार्क करणाऱ्या चार हजार ४११ वाहनचालकांसह तसेच वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर न करणारे एक हजार ७७४, तसेच विनाहेल्मेट दुचाकी चालविणारे दोन हजार ४५९, सिग्नल जंप करणारे एकूण ४०० वाहनचालक, तसेच मद्यपान करून वाहन चालविणारे ४७ वाहनचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
..................
उच्चस्तरीय जलकुंभ दुरुस्त करण्याची मागणी
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) ः घणसोली येथील नोडल भागात सिडकोकडून उच्चस्तरीय जलकुंभाची बांधणी करण्यात आली आहे, मात्र या जलकुंभाला अनेक वर्षे झाल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने या जलकुंभाची दुरुस्ती करावी अन्यथा नव्याने बांधण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपशहरप्रमुख पुष्पक मढवी यांनी पालिका प्रशासनासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. घणसोली नोडमधील सेक्टर-८ येथे सिडकोकडून जलकुंभाची बांधणी करण्यात आली होती, परंतु या २५ लाख लिटर क्षमतेच्या उच्चस्तरीय जलकुंभाचा वापर आजतागायत कधीही करण्यात आलेला नाही. त्यामुळे या जलकुंभाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जलकुंभाची दुरुस्ती करावी अन्यथा नवीन बांधण्यात यावा, अशी मागणी मढवी यांनी केली आहे. सध्या घणसोलीमध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या जलकुंभाचा वापर करण्यात आला, तर नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असे मढवी यांनी सांगितले आहे.
..........
वेश्याव्यवसायप्रकरणी पनवेलमधील लॉजिंगवर छापा
लॉजचालक, मॅनेजरसह वेटर पोलिसांच्या ताब्यात
पनवेल, ता. १३ (वार्ताहर) : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने नुकतेच पनवेलच्या कोन भागातील भूषण लॉजिंग ॲन्ड बोर्डिंगवर छापा मारून वेश्याव्यवसाय चालविणारा लॉजचा चालक, मॅनेजर आणि वेटर अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी वेश्याव्यवसायासाठी लॉजमध्ये ठेवण्यात आलेल्या सहा महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी लॉजिंग चालवणाऱ्या इतर चालकांविरोधातदेखील गुन्हा दाखल केला आहे.
पनवेलमधील कोन, नारपोली भागातील भूषण लॉजिंग ॲन्ड बोर्डिंगमध्ये जाणाऱ्या ग्राहकांसाठी तीन ते चार हजार रुपयांमध्ये वेश्याव्यवसाय चालविण्यात येत होता. यासाठी या मुलींचा वापर केला जात होता. याबाबतची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे व त्यांच्या पथकाने गत गुरुवारी १० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास भूषण लॉजिंग ॲन्ड बोर्डिंगमध्ये बनावट ग्राहकाला पाठवून खात्री केली. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने लॉजिंगवर छापा मारला असता, या वेळी सहा महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केलेल्या चौकशीत लॉजिंगचा मॅनेजर किशोर गर्दे व चालक लोकेश देवराज गौडा, शिवसागर गुप्ता व वेटर अभिलाष कृष्णा शेट्टीसह मुली व महिलांना फोन करून लॉजिंगमध्ये बोलावून घेऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले.
...................
कांदा-बटाटा मार्केटचा पुनर्विकास लवकरच
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) ः कांदा-बटाटा आणि मसाला मार्केटच्या पुनर्विकासाचा विषय मार्गी लावण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बैठक झाली. येत्या महिनाभरात यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
गेल्या २० वर्षांपासून कांदा-बटाटा बाजार पुनर्बांधणीचा विषय सुरू आहे. बाजार समिती आणि व्यावसायिक यांच्यात एकमत होत नसल्याने पुनर्विकासाचा विषय मार्गी लागलेला नाही. त्यामुळे धोकादायक मार्केटच्या आवारात व्यापारी जीव मुठीत घेऊन व्यापार करत आहेत. सुरुवातीला व्यापारी आणि बाजार समिती यांच्यात एकमत होत नसल्याने हा विषय रखडला. त्यानंतर न्यायालयात अनेक वर्षे हा विषय रखडला होता. त्यानंतर इतक्या वर्षांनी व्यापारी आणि बाजार समितीचे बाजाराच्या बांधकामाबाबत एकमत झाले आहे. आता हे पुनर्बांधणीचे काम कुणाला द्यायचे, यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आमदार म्हात्रे यांना बैठकीला बोलवले होते. विकसकाच्या निवडीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांनी एपीएमसी प्रशासन व संचालकांकडून याबाबत सविस्तर माहिती घेतली. या वादावर तोडगा काढण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मार्केटमधील धोकादायक इमारतीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याआधीच विकासकामांना सुरुवात केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. ही बैठक मुंबई समितीचे सभापती प्रभू पाटील यांच्या दालनात पार पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

