अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त जनजागृती
अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त जनजागृती
आज भायखळ्यातील मुख्यालयात शहिदांना श्रद्धांजली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ ः अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त अग्निशमन दलाकडून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाद्वारे अग्निशमन सेवा दिनानिमित्ताने सोमवारी (ता. १४) सकाळी ९ वाजता मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्यालयाच्या प्रांगणात शहिदांना श्रद्धांजली कार्यक्रम होणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, उपआयुक्त प्रशांत गायकवाड यांचीही उपस्थिती असणार आहे. १४ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त विविध उपक्रम पार पडणार आहेत. यानिमित्ताने मुंबईत विविध ठिकाणी अग्निप्रतिबंध व अग्निसुरक्षाविषयक प्रात्यक्षिके, व्याख्याने, प्रदर्शन यांचे आयोजन केले आहे.
मुंबईत आगीसारख्या घटनांमध्ये किमान कालावधीत प्रतिसाद देण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच शाळा, रुग्णालये तसेच व्यापारी संकुल या ठिकाणी अधिकाधिक नागरिकांना अग्निसुरक्षेबाबतच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी दिल्या आहेत. विविध ठिकाणी अग्निप्रतिबंध व अग्निसुरक्ष विषयक प्रात्यक्षिके, व्याख्याने, प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये अग्निसुरक्षा रॅली, अग्निशमन उपकरणांचे प्रदर्शन, अग्निसुरक्षेविषयी जनजागृतीबाबत भित्तिपत्रकांचे वाटप, व्याख्याने व प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. तसेच रुग्णालये, व्यापारी संकुल, शाळा, निवासी संकुल आदी ठिकाणी आग लागल्यास कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. वांद्रेतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर, इएसआयसी रुग्णालय, मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालय, ताडदेव येथील भाटिया रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, आदी ठिकाणी प्रात्यक्षिके आणि रंगीत तालीम सादर करण्यात येणार आहेत.
१२५ शाळा, रहिवासी संकुलांमध्ये व्याख्याने
मुंबई महानगरातील शाळा आणि रहिवासी संकुलांच्या ठिकाणी अग्निसुरक्षेवरील व्याख्याने आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये प्राथमिक अवस्थेतील आग शमवण्याच्या पद्धती, फायर एक्टिंग्विशरचा वापर, स्वयंपाक घरातील गॅसगळती रोखण्याचे उपाय आदींची माहिती देण्यात येणार आहे. तसेच १२५ शाळा आणि रहिवासी संकुल येथे अग्निसुरक्षेवरील व्याख्याने तसेच प्रात्यक्षिकांचे आयोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

