कामाच्या एआरटी केंद्रात जन्मले पहिले बाळ
कामाच्या एआरटी केंद्रात जन्मले पहिले बाळ
उत्तर प्रदेशहून निराशेतून आली मुंबईला, १५ वर्षांनंतर यश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे राहणाऱ्या एका निपुत्रिक दाम्पत्याला मुंबईत मूल झाल्याचा आनंद मिळाला आहे. कामा रुग्णालयाच्या आयव्हीएफ प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या एआरटी म्हणजे कृत्रिम पुनरुत्पादन केंद्रात यशस्वी उपचारांमुळे हे शक्य झाले आहे. अपत्यहीन जोडप्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या एआरटी केंद्रात बुधवारी (ता. ९) पहिल्या मुलीचा जन्म झाला.
उत्तर प्रदेशातील या जोडप्याला १५ वर्षांपासून मूल व्हावे, अशी इच्छा होती. आता मूल झाल्याच्या आनंदाने हे दाम्पत्य अत्यंत खूश आहे. कामा रुग्णालयात कृत्रिम पुनरुत्पादन केंद्र (एआरटी) सुरू केल्यानंतर ४०० हून अधिक निपुत्रिक महिलांनी नोंदणी केली आहे. या केंद्रात महिलांवर गर्भधारणेसाठी विविध प्रकारे उपचार केले जातात. त्यापैकी एका ३५ वर्षीय महिलेने यशस्वी उपचारानंतर एका मुलीला जन्म दिला.
बाळासाठी नेपाळही गाठले
स्वतःचे बाळ व्हावे, या उद्देशाने या जोडप्याने उत्तर प्रदेशमधून नेपाळही गाठले. तिथे उपचार घेतल्यानंतरही ही महिला गर्भधारणा करू शकली नाही. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले, की लग्नानंतर मूल होऊ इच्छिणाऱ्या महिलेला गर्भधारणा होऊ शकली नाही. यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश आणि नेपाळमध्ये उपचारही केले; मात्र ते यशस्वी झाले नाही. हतबल महिला गेल्यावर्षी मार्चमध्ये कामा रुग्णालयात उपचारांसाठी आली होती. महिलेची सिझेरियन प्रसूती झाल्याचे डॉ. पालवे यांनी सांगितले.
ओव्हुलेशन इंडक्शन पद्धत काय आहे?
डॉ. पालवे यांनी स्पष्ट केले, की ओव्हुलेशन इंडक्शन ही एकापेक्षा जास्त अंडाशय तयार करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा अंडाशय पिकून फुटण्याची वेळ येते, तेव्हा महिलेला तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे स्त्री गर्भवती राहण्याची दाट शक्यता असते. डॉ. तुषार पालवे पुढे म्हणाले, की सध्या रुग्णालयाला वंध्यत्वाच्या पहिल्या टप्प्यातील उपचारांसाठी परवानगी मिळाली आहे, ज्यामध्ये इंट्रा युटेरिन इन्सेमिनेशन (आययूआय), ओव्हुलेशन इत्यादी प्रक्रियांचा समावेश आहे. त्यांनी सांगितले, की दुसऱ्या स्तरावर ज्यामध्ये आय.व्ही.एफ. प्रक्रिया केली जाते. यासाठी लवकरच परवानगी मिळेल.
प्रक्रिया कशी होते?
कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले, की महिलांना मासिक पाळीच्या पाच ते १० दिवस, दोन किंवा तीन दिवस आधी औषधे किंवा इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर दर तिसऱ्या किंवा चौदाव्या दिवशी सोनोग्राफीच्या मदतीने निरीक्षण केले जाते. जेव्हा फॉलिकल्स योग्य आकाराचे असतात, तेव्हा एचसीजीच्या इंजेक्शनद्वारे ओव्हुलेशन सुरू होते आणि आययूआय प्रक्रिया सुमारे ३६ तासांनंतर केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

