चार अल्पवयीन मुलांचा ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक
अल्पवयीन मुलाकडून नऊ लाखांचे दागिने लुटले
सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ पालकांना दाखवण्याची धमकी
उल्हासनगर, ता. १३ (वार्ताहर) : शहरात अल्पवयीन मुलांमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. केवळ एक सिगारेट ओढतानाची व्हिडिओ क्लिप वापरून चार अल्पवयीन मित्रांनी आपल्याच एका मित्राला सातत्याने ब्लॅकमेल करत तब्बल नऊ लाख ५९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने उकळले आहेत. याप्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी शनिवारी (ता. १२) उल्हासनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
पीडित मुलगा उल्हासनगर कॅम्प १ येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा आहे. तो एका खासगी क्लासमध्ये शिक्षण घेतो. काही काळापूर्वी त्या क्लासमध्येच त्याच्या चार मित्रांनी सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ केला होता. यानंतर या चौघांनी पीडितावर दबाव टाकण्यास सुरुवात केली.
१४ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत या चार मित्रांनी घरच्यांना व्हिडिओ दाखवण्याची धमकी देत पीडित मुलाकडून वेळोवेळी घरातील सोन्याचे दागिने मिळवले. इतकंच नव्हे तर त्यांनी धमकी दिली की, जर त्याने सहकार्य केले नाही, तर ही क्लिप त्याच्या पालकांना आणि पोलिसांना दाखवली जाईल, अशी धमकी दिल्याने पीडित मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. या काळात घरातून सोन्याचे दागिने गायब होत असल्याने पीडिताच्या पालकांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला घाबरलेल्या मुलाने शेवटी पालकांपुढे सर्व प्रकार उघड करताच पालक सुन्न झाले. त्यांनी तत्काळ उल्हासनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक यादव करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

