हंडाभर पाण्यासाठी मैलोन्‌ मैल पायपीट

हंडाभर पाण्यासाठी मैलोन्‌ मैल पायपीट

Published on

खोपोली, ता. १३ (बातमीदार) ः खालापूर तालुक्यात औद्योगिकीकरण वाढले असून, आगामी काळात नवनवीन प्रकल्‍प प्रस्तावित आहेत. शहरात मोठे-मोठे स्मारके उभी राहत असून, विकासकामे वेगाने सुरू आहेत. असे असताना मूलभूत सोयीसुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्‍याचे दिसते. एप्रिल महिना उजाडताच वाड्या-वस्त्या, दुर्गम गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवू लागते आणि हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन्‌मैलांची पायपीट करावी लागते. विकासकामांवर भर दिला जात आहे, मात्र महिलांच्या डोक्यावरील हंडा कधी उतरणार, असा प्रश्‍न ग्रामीण भागातील नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
खोपोली व खालापूर परिसरात सध्या विकासाची घोडदौड सुरू आहे, मात्र पाण्यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात येथील राजकीय व प्रशासकीय व्यवस्था अपूर्ण पडत असल्याचे चित्र आहे. खोपोली नगरपालिका क्षेत्रातील अनेक आदिवासी वाड्या व उंचावरील रहिवासी भाग, तालुक्यातील बीड, पळसदरी परिसरातील अनेक वाड्या वस्त्या, औद्योगिकीकरण झालेल्या साजगाव-आडोशी पट्ट्यातील दुर्गम वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्‍या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना बोअरवेल अथवा झऱ्याचा, विहिरीचा आधार घ्‍यावा लागतो. पाण्याची समस्या तीव्र होत असल्याने ग्रामीण भागातील कुटुंबे मोठ्या संख्येने खोपोली शहरात स्थलांतरित होत असल्‍याने गावे, वाड्या ओस पडत असल्‍याचे भयाण चित्र आहे.

अडीच महिने विकतचे पाणी
ग्रामीण भागात पिण्यायोग्य स्वच्छ पाणी उपलब्ध होत नसल्याने, जागोजागी जलशुद्धीकरण प्रकल्‍प उभे राहत आहेत. आर्थिक स्थिती बरी असलेले अनेक कुटुंब एप्रिल ते जून असे अडीच महिने विकतच्या पाण्यावर तहान भागवत असल्‍याचे चित्र खालापूर तालुक्यातील अनेक गावांत दिसून येत आहे. एका बाजूला विकास व दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जलजीवनची अपुरी असलेली कामे, याशिवाय कामांतील त्रुटी, ठेकेदाराने मनमानी पद्धतीने केलेले काम आणि पाणी वितरणातील अडचणींमुळे दिवसेंदिवस परिसरातील पाणीटंचाईच्या झळा अधिकाधिक जाणवू लागल्‍या आहेत.

खोपोली : अनेक गावे व वाड्या-वस्त्यांवर महिला हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com