महापालिकेने जपला बाबासाहेबांचा वैचारिक वारसा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : जगाला शांततेचा मार्ग दाखवणारे भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचारांवर जगायला शिकवणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा टिकवण्यात नवी मुंबई महापालिकेला यश आले आहे. बाबासाहेबांना पुस्तक वाचण्याची मोठी आवड होती. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ ही बाबासाहेबांनी दिलेली शिकवण नवी मुंबई महापालिकेने ऐरोली येथे उभारलेल्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील ई-लायब्ररी आणि ग्रंथालयाने जपली आहे.
ऐरोली येथील स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेबांचे जीवनचरित्र दर्शन घडविणारे दुर्मिळ छायाचित्रांचे दालन, ऑडिओ-व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररीसह समृद्ध ग्रंथालय, अत्याधुनिक होलोग्राफिक आभासी चलचित्रप्रणालीद्वारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची सुविधा, एकाच वेळी २०० व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्य ध्यानकेंद्र, संविधानाविषयीच्या पुस्तकाचे विशेष दालन तसेच २५० आसन क्षमतेचे वातानुकूलित प्रशस्त सभागृह अशा उत्तम दर्जाच्या सुविधांनी हे स्मारक वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. स्मारकाचा ५० मीटर उंचीचा भव्य डोम रस्त्यावरून लांबूनच नजरेत भरतो व लक्ष वेधून घेतो. डॉ. बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतीक म्हणून या डोमला पेनच्या नीबचा आकार देण्यात आलेला आहे. आजकाल वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, पुस्तके वाचली जात नाहीत, व्याख्याने ऐकली जात नाहीत, असे निराशावादी सूर उमटत असताना स्मारकातील प्रत्येक व्याख्यानाला सभागृह हाऊसफुल्ल भरून सभागृहाबाहेर एलईडी स्क्रीन लावून थेट प्रक्षेपण करणे गरजेचे व्हावे, एवढी श्रोत्यांची गर्दी होत असल्याचे काहीसे दुर्मिळ चित्र येथे पाहावयास मिळत आहे.
------------------
परदेशातील नागरिकांनाही भुरळ
स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन, संविधान दिन, बौद्ध पौर्णिमा अशा चारही दिवशी नागरिकांची सात ते आठ हजारांहून अधिक उपस्थिती लाभलेली आहे. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी साधारणत: ३००हून अधिक नागरिक या ठिकाणी भेटी देताना दिसतात. अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह स्मारकामध्ये येऊन बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांना सहकुटुंब अभिवादन करतात. अनेक ठिकाणच्या संस्था, मंडळे, समूह एकत्र येऊन स्मारकाची शैक्षणिक सहल आयोजित करताना दिसतात. राज्यातील विविध जिल्ह्यांप्रमाणेच देशाच्या विविध प्रांतांतून तसेच परदेशातूनही नागरिक या स्मारकाचे वेगळेपण अनुभवण्यासाठी भेट देत असतात.
--------------
साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांची भेट
विविध शाळा, महाविद्यालये आपल्या विद्यार्थ्यांच्या सहली स्मारक दर्शनासाठी आयोजित करीत असून, हे स्मारक बघताना विद्यार्थ्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह व बाबासाहेबांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाबद्दल त्यांच्या मनात दाटून आलेला आदर त्यांना नवी प्रेरणा देताना दिसतो. तीन हजारांहून अधिक ग्रंथसंपदेने समृद्ध असे येथील ई-लायब्ररी व अत्याधुनिक ग्रंथालय हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या व त्यांच्या विचारांचा जागर करणाऱ्या पुस्तकांमुळे अभ्यासकांसाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा आहे. केवळ सव्वातीन वर्षांतच ३.५ लाखांहून अधिक नागरिकांनी या ठिकाणी भेट देऊन, स्मारक पाहिल्यानंतर भारावून जाऊन या स्मारकाचा नावलौकिक सर्वदूर पसरविलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

