कल्याण शिळ रोड अवजड वाहतुकीसाठी बंद

कल्याण शिळ रोड अवजड वाहतुकीसाठी बंद

Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सोमवारी (ता. १४) जयंती असून, या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रम व मिरवणुका निघणार आहेत. या मिरवणुका शांततेत व वाहतुकीच्या अडथळ्याविना पार पडाव्यात, यासाठी वाहतूक विभागाने शिळ फाटा रस्त्यासह कल्याणमधील अंतर्गत रस्ते सोमवारी दुपारी १२ ते रात्री १२ या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

वाहतूक विभागाचे पोलिस आयुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर, डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पाटील, कल्याण वाहतूक विभागाचे रामचंद्र मोहिते यांनी बंद, पर्यायी रस्ते मार्गाचे नियोजन केले आहे. कल्याण शहरात शिळ फाटा, अंबरनाथ, बदलापूरकडून येणारी जड, अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
शिळ फाटा रस्त्यावरील कल्याण फाटा येथून (दत्त मंदिर) कल्याण, डोंबिवली शहराकडे येणाऱ्या जड, अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने मुंब्रा बाह्यवळण रस्ता, खारेगाव, मुंबई-नाशिक महामार्गाने पुढे जातील. नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाने रांजणोली वळण रस्ता दुर्गाडी किल्ला येथून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना दुर्गाडी चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने सोमवारी रात्री १२ वाजल्यानंतर इच्छितस्थळी सोडण्यात येणार आहेत.

या ठिकाणी प्रवेश बंद
* कर्जत, बदलापूर, अंबरनाथ भागातून कल्याण शहरात येणाऱ्या जड, अवजड वाहनांना काटई-बदलापूर रस्त्यावरील नेवाळी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
* नवी मुंबई, पनवेल, उरण भागातून कल्याण शहराकडे येणाऱ्या जड, अवजड वाहनांना खोणी येथील निसर्ग ढाबा येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने बदलापूर, अंबरनाथ, काटई-बदलापूर चौक, लोढा पलावा-कल्याण फाटामार्गे इच्छित स्थळी जातील.
* कल्याण पश्चिम, उल्हासनगर भागातून कल्याण पूर्वेत येणाऱ्या सर्व जड वाहनांना सम्राट चौक वालधुनी येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
* मलंग रस्ता, चक्की नाका भागातून विठ्ठलवाडी, उल्हासनगरकडे जाणाऱ्या जड वाहनांना चक्कीनाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

काटेमानिवली येथे उत्सव, मिरवणुका
कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील ड प्रभाग कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉ. आंबेडकर जयंतीचा उत्सव आणि मिरवणुका होणार आहेत. सुमारे १५ हजार अनुयायी या उत्सवात सहभागी होणार आहेत. यासाठी उल्हासनगर भागातून कल्याण पूर्व कोळसेवाडी भागाकडे येणाऱ्या जड, अवजड, खासगी, एसटी बसना श्रीराम चौक येथे प्रवेश करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com