कर्जत तालुक्यात ९७ गावांमध्ये हनुमान जयंतीचा जल्लोष;

कर्जत तालुक्यात ९७ गावांमध्ये हनुमान जयंतीचा जल्लोष;

Published on

कर्जत तालुक्यात ९७ गावांमध्ये हनुमान जयंतीचा जल्लोष
३३ गावांमध्ये पारंपरिक पालखी मिरवणुका
कर्जत, ता. १३ (बातमीदार) ः हनुमान जयंतीचा उत्सव कर्जत तालुक्यात मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. तालुक्यातील एकूण १९६ गावांपैकी ९७ गावांमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये ३३ गावांमध्ये पारंपरिक पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. चोख पोलिस बंदोबस्‍त असल्याने हनुमान जयंती उत्‍साहात साजरी झाली.
कर्जत पोलिस ठाणे हद्दीत १०६ गावांपैकी ५२ गावांमध्ये हनुमान जयंती साजरी झाली असून, त्यापैकी १७ ठिकाणी पालखी मिरवणुका काढण्यात आल्या. तसेच नेरळ पोलिस ठाणे हद्दीत ९० पैकी ४५ गावांमध्ये हा उत्सव पार पडला असून, १६ ठिकाणी पालखी सोहळे साजरे करण्यात आले.
उत्सवाच्या आदल्या दिवशी अनेक गावांमध्ये जागर, भजन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य दिवशी काकड आरती, हनुमान जन्मोत्सव, सत्यनारायण महापूजा, हरिपाठ, भजन-कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते. टाळ, मृदंग आणि भक्तिरसाने न्हालेल्या पालखी मिरवणुकांनी अनेक गावांमध्ये वातावरण दुमदुमले. गावापासून दूर असलेले शहरी भाविकसुद्धा आपल्या मूळ गावात येऊन या उत्सवात सहभागी झाले. यंदाचा सर्वात मोठा सोहळा कशेळे गावामध्ये पार पडला, जिथे मोठ्या संख्येने आदिवासी बांधव व गावकरी एकत्र येतात. यात्रेच्या स्वरूपात हनुमान जयंती साजरी करताना ग्रामस्‍थ दिसून आले. संपूर्ण तालुक्यात उत्सव शांततेत पार पडला असून, परंपरा आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम या हनुमान जयंतीनिमित्त पाहायला मिळाला.
............
रोह्यात नाट्यगीतांनी भारावले भाविक
रोहे, ता. १३ (बातमीदार) : रोहे शहरातील पुरातन मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी ( ता. १२) रोजी पहाटे साडेपाच वाजता जन्मोत्सवानिमित्त सुषमा माधव भावे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. पूजा, अभिषेक, आरती आणि प्रसाद कार्यक्रम तसेच मंदिरात विद्युत रोषणाई, रांगोळ्या, रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी मंदिर सुशोभित करण्यात आले होते. हनुमान व श्रीराम प्रभूच्‍या गोड गीतांनी परिसर दुमदुमाला होता. सायंकाळी ६ वाजता रेवदंडा येथील हभप संदीप वामन केळकर व रोहे येथील प्रसिद्ध मंदार माधव भावे व त्यांचे अन्य साथीदार यांचा अत्यंत सुंदर अभंगवाणी तसेच नाट्य गीतांचा आविष्कार हा अविस्मरणीय उत्तम कार्यक्रम झाला. हनुमान मंदिराच्या सभा मंडपाचे काम सुरू असल्यामुळे काही कार्यक्रम समोरील राम मंदिरात घेण्यात आले. सकाळपासून रात्री ११ वाजेपर्यंत हजारो भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंत्री आदिती तटकरे यांनीदेखील हनुमानाचे दर्शन घेतले. त्यांचा मारुती मंदिर ट्रस्टतर्फे विश्वस्त यांनी शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती मंडळ ट्रस्टचे विश्वस्त आनंद कुळकर्णी, मोतीलाल जैन, अरुण करंबे तसेच दिलीप पवार तसेच भक्तगणांनी मोठे परिश्रम घेतले. तसेच हनुमान टेकडी मंदिर येथेही जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com