भाजपचा शिंदेना दे धक्का

भाजपचा शिंदेना दे धक्का

Published on

भाजपचा शिंदेंना दे धक्का
माजी नगरसेवकाचा पक्षप्रवेश; मिशन पालिकेच्या दिशेने पाऊल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : आगामी ठाणे महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने सुरू केलेल्या ‘मिशनला’ आणखी बळ देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. घोडबंदर पट्टा मजबूत करण्यासाठी भाजपने टाकलेल्या जाळ्यात ठाकरे गटानंतर आता शिंदे गटाचे माजी नगरसेवकही आले आहेत. आता शिंदे गटाचे लॉरेन्स डिसोझा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाण्यात भाजपने शिवसेना शिंदे गटाला दिलेला हा धक्का मानला जात आहे.

ठाणे पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्यासाठी विविध पक्षांतील माजी नगरसेवकांचे भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे गटातील नाराज माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला होता. त्यानंतर भाजपने आता आपला मोर्चा शिवसेना शिंदे गटाकडे वळवला आहे. त्यानुसार शिंदे गटाचे माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गटातील उपविभागप्रमुख आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. १३) भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

डिसोझा यांची कन्या स्टेफनी डिसोझा यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख रामेश्वर बचाटे, आंबेडकरी चळवळीतील महेश चव्हाण यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. ठाणे शहरात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार रविवारी पक्षप्रवेश सोहळा पार पडला, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली. या वेळी माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डुंबरे, माजी नगरसेविका स्नेहा आंब्रे, सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्षा स्नेहा पाटील, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सूरज दळवी, ओवळा-माजिवडा मंडल अध्यक्ष हेमंत म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

जायंट किलर अशी ओळख
ठाणे महापालिकेत २०१२मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर माजिवडा गाव परिसरातून लॉरेन्स डिसोझा निवडून आले होते. त्या वेळी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवलेल्या देवराम भोईर यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यामुळे डिसोझा यांची ओळख जायंट किलर अशी झाली होती. पण २०१७च्या निवडणुकीत डिसोझा यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण आता पुन्हा ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, शिंदे गटाकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा मावळली असल्याची कुणकूण लागताच त्यांनी भाजपचा हात पकडला असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com