पीडितेच्या कुटुंबाने व्यक्त केले समाधान
देवानेच ही शिक्षा दिली!
पीडितेच्या कुटुंबाची विशालच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ ः कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी विशाल गवळी याने तळोजा येथील कारागृहात आत्महत्या केली. या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने त्याच्या आत्महत्येवर समाधान व्यक्त करीत ‘देवानेच ही शिक्षा त्याला दिली’, अशी प्रतिक्रिया दिली.
आरोपीच्या वकिलांनी जी भीती होती तेच झाले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय स्तरातूनदेखील विविध प्रतिक्रिया उमटत असून, नराधमाला फाशीची शिक्षा होईल या भीतीपोटी त्याने आत्महत्या केली असावी. जे झाले ते बरेच झाले, असे मत राजकारण्यांनी व्यक्त केले आहे. कल्याण पूर्वेतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करू तिची हत्या करण्यात आली होती. यानंतर तिचा मृतदेह बापगाव येथील स्मशानभूमीच्या बाजूला टाकून देण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी विशाल गवळी व त्याची पत्नी साक्षी हिला अटक केली. ते दोघे न्यायालयीन कोठडीत होते. रविवारी विशाल गवळी याने तळोजा येथील कारागृहात गळफास घेत आत्महत्या केल्याची बातमी आली. पीडित मुलीच्या घराबाहेर पोलिस संरक्षण देण्यात आले होते.
पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले, की माझी मुलगी तर गेलीच आहे, ती काही परत येणार नाही. तिचा मारेकरी विशाल याला फाशी व्हावी, अशी आमची सगळ्यांची मागणी होती. त्याने माझ्या मुलीसोबत जे कृत्य केले ते दुसऱ्या कोणा मुलीसोबत होऊ नये, यासाठीच कदाचित देवाने त्याला ही शिक्षा दिली आहे. आम्ही मुलीच्या हत्येप्रकरणी कोर्टात केस लढत होतो. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिस प्रशासन यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला सहकार्य केले. सरकारने आम्हाला न्याय दिला. आम्ही त्यांचे आभारी आहोत.
...
कुटुंबाला धोका होऊ शकतो!
पीडित मृत मुलीचे वकील नीरज कुमार म्हणाले, की विशाल याने आत्महत्या केल्याची माहिती प्रशासनाने आम्हाला दिली. ही हत्या आहे की आत्महत्या हा तपासाचा विषय आहे; परंतु आम्हाला न्याय मिळालेला आहे. यातच आम्हाला आनंद आहे. विशाल याच्या कुटुंबाकडून फिर्यादीच्या कुटुंबाला धोका होऊ शकतो. त्यामुळे त्यांना सुरक्षा मिळावी, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे. पोलिस सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे.
...
पोलिसांवर आरोप
संशयित आरोपी विशाल गवळी याचे वकील संजय धनके याविषयी म्हणाले, की विशाल याने आत्महत्या केल्याचे समजले आहे. तेथे गेल्यानंतर सत्य परिस्थिती आम्हाला समजेल; परंतु ज्याची भीती होती तेच झाले आहे. पोलिस यंत्रणेने विशालला मारले आहे. अक्षय शिंदेच्या बाबतीत असेच झाले होते, तीच भीती आम्हाला होती. म्हणून आम्ही न्यायालयात अर्ज दिला होता की अक्षय शिंदेसारखे पोलिस विशाल गवळीलादेखील मारतील. त्यामुळे त्याच्या सुरक्षितेसाठी काही करता आले तर करावे. त्याची पोलिस कोठडी सुरू होती; मात्र त्या अर्जावर न्यायालयात काही निर्णय झाला नाही. वीस-पंचवीस दिवसांपूर्वी मी त्याला भेटलो असता, त्याने मला खूप काही माहिती दिली होती. त्या वेळी त्याने येथेही माझ्या जीवाला धोका आहे, असे सांगितले होते.
...
विशाल गवळी याने त्याचे जीवन संपवले आहे. कायद्याच्या कचाट्यात तो पूर्णपणे अडकला होता. कायद्याने त्याला फाशी झाली असती, तर असे कृत्य करणाऱ्यांना फार मोठा वचक बसला असता. कायद्याच्या शिक्षेला घाबरून त्याने आत्महत्या केली असावी. सर्वसामान्यांची इच्छा होती की त्याला कायद्याने फाशी व्हावी. यामुळे अशा समाजकंटकांना आळा बसला असता. पीडित मुलीला, तिच्या कुटुंबाला नैसर्गिक न्याय मिळाला आहे. कायद्याने झाले असते तर चांगला संदेश समाजात गेला असता.
- विश्वनाथ भोईर, आमदार, कल्याण पश्चिम शिवसेना शिंदे गट
...
येथील नागरिकांची इच्छा होती की त्याला फाशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील फास्टट्रॅकवर ही केस लढवली जाईल व तीन-चार महिन्यांत त्याला शिक्षा होईल, असे सांगितले होते. फाशीची शिक्षा होणार, या भीतीने त्याने हे कृत्य केले
आहे. पीडित मुलगी, तिच्या कुटुंबाला, आम्हाला न्याय मिळाला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून त्याला फाशी झाली असती, तर इतर आरोपींना जरब बसला असता.
- सुलभा गायकवाड, आमदार, कल्याण पूर्व, भाजप
...
त्या चिमुरडीला आज न्याय मिळाला आहे; पण ज्या पद्धतीने तिला न्याय मिळाला आहे, तो आम्हाला अपेक्षित नव्हता. त्याला न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून कोर्टात उभे करून शिक्षा मिळायला हवी होती. तसेच अशी शिक्षा व्हावी हवी होती ज्यामुळे असे कृत्य करणाऱ्याची कोणाची हिंमत होणार नाही.
- दिपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
...
विशाल गवळीने आत्महत्या केली याचा आम्हाला काही आनंद नाही. आमचे समाधान झालेले नाही. ज्या पद्धतीने तिच्यासोबत क्रूर कृत्य केले, ते पाहता शासनाने तीन महिन्यांच्या आत त्याच्यावर केस चालवून भरचौकात त्याला फाशी दिली असती तर समाधान वाटले असते. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जे नराधम आहेत, त्यांना असे कृत्य करताना धाक बसला असता.
- महेश गायकवाड, माजी नगरसेवक, कल्याण पूर्व
...
कल्याण पूर्वेतील गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम
- २३ डिसेंबरला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण
- आईकडून २० रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली
- अल्पवयीन मुलगी परत न आल्याने कुटुंबाकडून मुलीचा शोध सुरू
- मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार
- २४ डिसेंबर रोजी मुलीचा मृतदेह कल्याणनजीक भिवंडी बापगाव परिसरात सापडला
- मुलीच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. हॉस्पिटलला पाठवण्यात आला
- शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले की मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली
- पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षीचेही नाव समोर आले
- विशाल गवळी याची पत्नी साक्षीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले
- पत्नीने दिलेल्या माहितीनुसार मुलीला सायंकाळी पाच वाजता घरात घेतले. त्या वेळी विशाल गवळीने मुलीसोबत गैरकृत्य करून हत्या केली. त्यानंतर एका मोठ्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला
- आरोपीची पत्नी बँकेत नोकरी करीत असल्याने संध्याकाळी ७ वाजता घरी आली
- ७ वाजता दोघे पती-पत्नी एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे याबद्दल योजना आखली
- त्याआधी घरातील रक्त दोघांनी पुसून टाकले. रात्री ८.३० वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली. ९ वाजता भिवंडी- बापगावच्या दिशेने रवाना झाले. तिथे मृतदेह फेकून दोघे घरी परतले.
- घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या गावी बुलडाणा, शेगाव येथे निघून गेला. पत्नी साक्षी मात्र येथेच राहिली.
- घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशाल याने हे कृत्य केल्याचा संशय आला. पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
- पोलिसांनी विशालला पत्नीच्या गावातून शेगाव येथून ताब्यात घेतले, तर पत्नी साक्षीला कल्याणमधून अटक केली
- पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार अटक आरोपी विशाल गवळीला तळोजा येथील कारागृहात ठेवले, तर पत्नी साक्षीला मुंबई भायखळा येथील कारागृहात ठेवले
...
विकृत विशालची गुन्हेगारी पार्श्वभूमी
विशाल गवळी याने याआधी अशाच प्रकारची घाणेरडी कृत्य केली आहेत; मात्र त्या प्रकरणांमध्ये मनोरुग्ण असल्याचे सर्टिफिकेट त्याने कोर्टात सादर केले होते. त्यामुळे त्याला जामीन ही मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा सर्व चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी आपला रिपोर्ट सादर केला. डॉक्टरांनी तो मानसिकदृष्ट्या फिट असल्याचा रिपोर्ट दिला आहे. ६० दिवसांत विशाल गवळी विरोधात १,००६ पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. राज्यभरातील वाढता दबाव पाहता या खटल्यात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे काम पाहणार असल्याची घोषणा करण्यात आली. विशालचे तीन भाऊ शाम, नवनाथ आणि आकाश हे सराईत गुन्हेगार असून, कोळसेवाडी पोलिसांनी त्यांना चार महिन्यांपूर्वी ठाणे, रायगड, मुंबई जिह्यांतून हद्दपार केले आहे.
...
विकृत विशालवर आठ गुन्हे
- २०१५मध्ये प्राणघातक हल्ला
- २०१६मध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
- २०१९मध्ये विशाल गवळीला तडीपार केले होते; मात्र त्याने आदेशाचा भंग केला.
- २०२०मध्ये पुन्हा तडीपारीचा आदेश भंग केला
- २०२१मध्ये एका मुलीवर लैंगिक अत्याचार
- २०२२मध्ये लुटीची घटना
- २०२३मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
- २०२४मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

