बेकायदा नळजोडण्या पडणार महागात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ ः मुंब्रा, दिव्यातील बेकायदा नळजोड्या देणाऱ्या वॉलमन ते कार्यकारी अभियंत्यांवर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे बेकायदा बांधकामांना नळजोडण्या देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळणार आहे.
पाणीपट्टी वसुलीसाठी ठाणे महापालिकेने काही महिन्यांपासून धडक मोहीम उघडली आहे. या वेळी मुंब्रा, दिवा प्रभागात बेकायदा नळजोडण्यांनी रोज लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यासाठी एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पालिकेने या प्रभागांमध्ये मोर्चा वळवत बेकायदा नळजोडण्या तोडण्यास सुरुवात केली. यासाठी पालिकेने विभागनिहाय पथक तयार करून पहिल्या दिवशी २९, दुसऱ्या दिवशी ४४ तर तिसऱ्या दिवशी ५७ बेकायदा नळजोडण्या पालिकेने तोडल्या. त्याचबरोबर अनधिकृत आरओ प्रकल्प, पाणीसाठे आणि टँकर भरणा केंद्रांवरही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोन गुन्हेही दाखल करण्यात आले. या पाणीचोरीमध्ये भूमाफिया, बेकायदा इमले उभारणारे ‘विकसक’ यांचा मोठा हात असला तरी पालिका कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण सहकार्यामुळेच असे प्रकार घडत असल्याचे कारवाईदरम्यान समोर आले आहे. याची गंभीर दखल पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत पाणीचोरीचा आढावा घेताना त्यांनी बेकायदा नळजोडण्या घेणाऱ्यांवर कारवाई करताना त्यांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या वॉलमन ते कार्यकारी अभियंत्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, यापुढे बेकायदा नळजोडणी दिसल्यास प्रभागातील संबंधित पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

