अशी ज्ञानकेंद्रे राज्यभर उभारणार

अशी ज्ञानकेंद्रे राज्यभर उभारणार

Published on

अशी ज्ञानकेंद्रे राज्यभर उभारणार
सामंत, शिरसाठ यांची कल्याणमध्ये घोषणा

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य कल्याण येथे उभारण्यात आलेल्या ज्ञानकेंद्रांच्या माध्यमातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करीत आहेत. अशी ज्ञानकेंद्रे संपूर्ण राज्यात उभारली जातील, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी कल्याण येथे आज केली. कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
कल्याण पूर्वेतील ड प्रभाग समिती कार्यालयाच्या आवारात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात देशातील आगळ्यावेगळ्या ज्ञानकेंद्राचे लोकार्पण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट होलोग्राफी, विविध माहितीपटाच्या माध्यमातून येथे उलगडण्यात आला आहे. शेकडो पुस्तकांचे ग्रंथालयही यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, त्यांचे साहित्य, त्यांची आंदोलने आणि विचार होलोग्राफीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी आता नागरिकांना मिळणार आहे. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे अपरिहार्य कारणामुळे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते. त्यांनी या स्मारकाचा प्रवास उलगडून सांगितला. या स्मारकासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही डॉ. शिंदे यांनी आभार मानले.
राज्यभर अशी ज्ञानकेंद्रे उभारणार, अशी घोषणा या वेळी मंत्री संजय शिरसाट यांनी केली. बाबासाहेबांचे विचार जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याचे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करीत आहेत. ही संकल्पनाच खूप मोठी आहे. त्यामुळे अशी ज्ञानकेंद्रे संपूर्ण राज्यात उभी करायला हवीत, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडले. याप्रसंगी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अण्णा रोकडे, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com