कल्याण अवती-भवती
डॉ. क्षितिज कुलकर्णी, प्रसन्न माळी यांना पुरस्कार
डोंबिवली : अजेय स्टुडिओज निर्मित आणि डॉ. क्षितिज कुलकर्णी दिग्दर्शित अभिजात मराठी कवितांवर आधारित ‘दशपदी’ या कार्यक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये झाली आहे. जगातील कोणत्याही भाषेत आणि मराठीतही प्रथमच ‘दशपदी’ची संकल्पना मांडण्यात आली आहे. या ‘दशपदी’मध्ये प्रसन्न माळी या एकाच कलाकाराने ३० पेक्षा अधिक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच कवितांना दृकश्राव्य माध्यमातून सादर करण्याचा हा वेगळा प्रयोग आहे. या पुरस्काराचे मानकरी डॉ. क्षितिज कुलकर्णी आणि अभिनेता, कलाकार प्रसन्न माळी तसेच अजेय संस्था व अजेय स्टुडिओज यांना डोंबिवली येथील श्री गणेश मंदिर येथे वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया टीमच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या देदीप्यमान सोहळ्यासाठी अजेय संस्थेचे अध्यक्ष गौरव संभूस आणि कार्यकारिणी सदस्य, युवा टीम उपस्थित होती. तसेच या कार्यक्रमाला गणपती मंदिर संस्थान तसेच पै फ्रेंड्स लायब्ररीचे सहकार्य लाभले.
.................
श्री गजानन विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळावा
कल्याण (वार्ताहर) : श्री गजानन विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मनोमिलन मेळाव्याचे आयोजन रविवारी (ता. २७) सकाळी नऊ वाजता करण्यात आले आहे. बालपणाच्या पायवाटांवरून चालत पुन्हा शाळेच्या उंबरठ्यावर पोहोचण्याचा हा क्षण अक्षर ओळख देणाऱ्या वर्गखोल्या, खोड्यांनी भरलेले दिवस आणि आईसारखी माया करणाऱ्या ‘मोठ्या बाई’ प्रतिभा भालेराव यांचं प्रेमळ शिक्षण या साऱ्या आठवणींना उजाळा देण्यासाठी श्री गजानन विद्यालयातील माजी विद्यार्थी एकत्र येणार आहेत. कल्याणच्या श्री गजानन विद्यालयात एक भावस्पर्शी स्नेहमेळावा आयोजित केला आहे. या दिवशी शाळेची वाटचाल, मोठ्या बाईंचा समर्पित प्रवास आणि विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात कोरलेले त्या क्षणांचे स्मरण उत्सवाच्या रूपात साजरे होणार आहे. शिशुविहार शाळेची स्थापना १९६६मध्ये ‘मोठ्या बाईं’च्या हस्ते केवळ तीन ते चार विद्यार्थ्यांपासून झाली. १९९० पर्यंत ती बदलापूरकर चाळीत कार्यरत होती. १९९० मध्ये शाळेचे नाव ‘श्री गजानन विद्यालय’ असे ठरलं आणि इथूनच १०वीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. २००८मध्ये शाळेला ‘आदर्श शाळा’ म्हणून सन्मान मिळाला. त्यानंतर मोठ्या बाईंसह शाळेने अनेक पुरस्कार पटकावले. या शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी आज जगभर विखुरले गेले असले तरी शाळेच्या आणि बाईंच्या आठवणींनी ते आजही बांधले गेले आहेत. त्याच प्रेमातून हे स्नेहसंमेलन आयोजित केले आहे. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्या प्रेमळ शिक्षिकेला वंदन करण्यासाठी, सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
.........................................
खिंडीपाडा येथे निरंकारी भक्तांचे रक्तदान
कल्याण (वार्ताहर) : खिंडीपाडा येथे संत निरंकारी सत्संग भवनमध्ये रविवारी (ता. १३) रक्तदान शिबिरात १५६ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात संत निरंकारी मिशनच्या मुलुंड, खिंडीपाडा, गोशाळा, भांडूप, कोकणनगर आणि कांजूर मार्ग या शाखांमधील २५० पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी रक्तदानासाठी आपली नावनोंदणी केली होती. यावरून त्यांच्या मानवतेचा करू या सन्मान, एकत्र येऊन करू या रक्तदान, या भावनेतून निष्काम मानवसेवेची प्रचिती येते. या शिबिराचे उद्घाटन सेक्टर संयोजक श्रीधर पाटील व सेवादल क्षेत्रीय संचालक अमोल सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. संत निरंकारी ब्लड बँक, विलेपार्ले यांनी या शिबिरात रक्तसंकलनाचे कार्य केले. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक मुखी गिरधारी भक्तानी यांच्या देखरेखीखाली सेवादल स्वयंसेवक व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
................
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
टिटवाळा (वार्ताहर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत भव्य मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मिरवणुकीत विविध ढोल-ताशा पथकांचे वादन, फेटे परिधान केलेले युवक आणि ‘जय भीम’च्या गजराने संपूर्ण टिटवाळा दुमदुमून गेला होता. स्थानिक शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या वेळी मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व आणि आजच्या पिढीसमोरील आव्हाने यावर मार्गदर्शन केले. संध्याकाळी दीपप्रज्वलन करून सामूहिक वंदन करण्यात आले.
.........................
भक्तिगीतच्या मैफलीचे आयोजन
डोंबिवली (बातमीदार) : अनंत वझे संगीत कला आणि क्रीडा प्रतिष्ठानतर्फे रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त ‘राम रतन धन पायो’ या भक्तिगीताच्या मैफलीचे आयोजन केले होते. ‘अयोध्येचा राजा’ या गीतापासून सुरू झालेला हा भक्तिमय प्रवास स्वये श्री रामप्रभू ऐकती, ठुमक चलत रामचंद्र, अंजनीच्या सुता अशा राम आणि हनुमंताच्या विविध रचनांच्या सादरीकरणाने रंगत गेला. सुप्रसिद्ध गायक महेश कंटे आणि पंडित भरत तेलंग यांनी एकाहून एक सुंदर भक्तिगीते सादर केली. हार्मोनियमवर जयंत फडके, तबल्यावर कौस्तुभ तळेकर आणि कीबोर्डवर जयंत पवार या वादकांनी सुरेल साथ दिली. विविध किस्से, गोष्टी, दृष्टांत सांगत तपस्या नेवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे विश्वस्त डॉ. दीपक वझे, डॉ. गौरी वझे, डॉ. प्रताप पानसरे आणि डॉ. ईशा पानसरे यांनी केले होते.
..................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.