गुन्ह्यांतील गाड्या आता थेट लिलावात
उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली आणि उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षांपासून धूळखात पडून राहिलेली शेकडो वाहने आता लिलावाच्या मार्गावर आहेत. ऊन, वारा, पाऊस यामुळे ही वाहने गंजून निकामी झाली आहेत. अनेक वाहनांचे चेसिस नंबर, इंजिन नंबर आणि रजिस्ट्रेशन प्लेट्स पूर्णपणे गंजून वाचता येणार नाहीत, अशा स्थितीत आहेत. त्यामुळे पोलिसांना वाहनांचे मूळ मालक शोधण्यात अडचणी येत आहेत. या वाहनांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पोलिस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली सुमारे शेकडो वाहने धूळखात पडून आहेत. न्यायालयीन प्रक्रिया आणि संबंधित मालक मिळून न आल्याने ही वाहने तेथेच पडून आहेत. यासाठी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलिस आयुक्त संजय जाधव, पोलिस उपआयुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांनी ही प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) चंद्रहार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार जावेद मुलानी व शिपाई अविनाश जाधव यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने प्रादेशिक परिवहन विभाग, कल्याण येथे पत्रव्यवहार करून प्रत्येक वाहनाच्या चेसिस आणि इंजिन नंबरच्या आधारे मालकांचा शोध घेतला. लवकरच संबंधित वाहनधारकांना अधिकृत पत्र पाठवले जाणार आहेत. ते पत्र मिळताच मालकांनी पोलिस ठाण्यात येऊन आपली वाहने तपासून कागदपत्रांच्या आधारे ताब्यात घ्यावीत, अशी माहिती देण्यात आली आहे. आठ दिवसांच्या आत वाहने न नेल्यास त्यांचा कायदेशीर लिलाव करण्यात येईल.
वाहनांच्या मालकांनी त्वरित वाहनांची कागदपत्रे सादर करून सात दिवसांच्या आत वाहने ताब्यात घ्यावीत. अन्यथा, कायदेशीर लिलाव प्रक्रिया राबवून ती वाहने लिलावात विकली जातील. त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जाईल.
- विष्णू ताम्हाणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उल्हासनगर पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

