

उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : नागरिकांच्या सोयीसाठी आणि तक्रारींच्या जलदगती निवारणासाठी उल्हासनगर महापालिकेने मुख्यालयात ‘मदत केंद्र’ सुरू केले आहे. महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पालिकेच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि शिस्त येणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा सकारात्मक अनुभव होण्यासाठी ‘मदत केंद्र’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या ठिकाणी महापालिकेत आलेल्या नागरिकांना त्यांच्या कामानुसार योग्य विभागात जाण्यासाठी आवश्यक माहिती आणि मदत मिळेल. नागरिक त्यांच्या समस्या मदत केंद्रात नोंदवू शकतात. त्यानंतर त्या तक्रारी संबंधित विभागाकडे तातडीने पाठवून त्यावर कार्यवाही केली जाईल. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मदत केंद्र असल्याने नागरिकांची विचारपूस करून त्यांना योग्य विभागात पाठविण्यात येते. ज्यामुळे अनावश्यक गर्दी टाळता येत आहे. कर भरणा, अतिक्रमण तक्रारी, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू नोंदणी यांसारख्या सेवांविषयी प्राथमिक माहिती येथे नागरिकांना पुरविली जाणार आहे.
मदत केंद्राच्या माध्यमातून महापालिका आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक सशक्त होईल. उल्हासनगरच्या विकासासाठी प्रशासनाने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे शहरातील नागरी सेवा अधिक प्रभावी आणि जलद होतील. शहरवासीयांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
नागरिकांना होणारे लाभ
* महत्त्वाच्या माहितीचा सहज व वेगवान पुरवठा : नागरिकांना आपल्या प्रश्नांची आणि तक्रारींची योग्य ठिकाणी नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.
* महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता : प्रशासकीय प्रक्रियेतील विलंब कमी होईल आणि नागरिकांच्या समस्या जलदगतीने सोडवल्या जातील.
* सुरक्षेच्या दृष्टीने अधिक दक्षता : महापालिका मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पडताळणी होऊन अनावश्यक वावर रोखता येईल.
* तक्रारींचे त्वरित निराकरण : योग्य प्रक्रियेचे पालन झाल्यास नागरिकांच्या समस्या अधिक तत्परतेने सोडवल्या जातील.
नागरिकांच्या समस्या अधिक जलदगतीने सोडवण्यासाठी आणि प्रशासन अधिक पारदर्शक व प्रभावी करण्यासाठी ‘मदत केंद्र’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नागरिकांना महापालिकेच्या विविध सेवांची माहिती सहज मिळावी आणि त्यांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही होण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल. सर्व शहरवासीयांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.