अग्निशमन केंद्राविना तळोज्याची परवड

अग्निशमन केंद्राविना तळोज्याची परवड

Published on

खारघर, ता. १५ (बातमीदार) : तळोजा शहर, तसेच वसाहतीपासून हाकेच्या अंतरावर पंधराहून अधिक गावे आहेत. या परिसरात सातत्‍याने आगीच्‍या घटना घडत असून वित्तहानीला सामोरे जावे लागत आहे. कळंबोली आणि खारघर अग्निशमन केंद्रातून वाहन येईपर्यंत मोठे नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी या परिसरात अग्निशमन केंद्र सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सिडकोने खारघरनंतर निर्माण केलेल्या तळोजा वसाहतीत एकूण ४० सेक्टरचा समावेश आहे. एक ते ३० सेक्टर वसाहतीत नागरिक वास्तव्य करीत असून उर्वरित सेक्टरमध्ये सिडकोकडून गृहप्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. तळोजा वसाहतीपासून काही अंतरावर, रोहिंजन, खुटारी, एकटपाडा, तुर्भे, पिसार्वे, सिद्धी करवले, धानसर, अडविली, किरवली, पेंधर, भोईर पाडा, घोट चाळ, गोंधळी पाडा, कोयनावळे, तळोजे मजकूर, देवीचा पाडा, पेठाली आदी १५ अधिक गावे आहेत. वसाहत आणि गावांची मिळून दोन लाखांहून अधिक लोकसंख्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन ते तीन वर्षांत तळोजा वसाहतीत अनेक भीषण आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. नुकताच अमर हार्मोनि सोसायटीच्या वीज वाहिन्या जळून गेल्याने लिफ्ट बंद पडल्यामुळे सोसायटीचे सदस्य आणि अग्निशमन जवानांनी २०हून अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढले होत. मागील वर्षी सेक्टर ११मधील ए के प्लाझा इमारतीच्या सातव्या माळ्यावर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने परिसरात धूर पसरला होता. त्या वेळी नऊ महिन्यांच्या बाळासह अनेक कुटुंबातील व्यक्ती जवळपास ५० मिनिटे अडकून पडले होते. अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.
-------------------------
कळंबोली, खारघरवर मदार
गेल्या दोन वर्षांत सिडकोचे गृहनिर्माण प्रकल्प उभारणीचे काम करणाऱ्या शिर्के कामगार वसाहतीत गॅस गळतीमुळे २५हून अधिक घरे जळून खाक झाली आहेत. यात मोठी वित्तहानी झाल्याचे प्रकार घडले आहेत. सिडकोच्या गृहसंकुलातदेखील आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. आगीच्‍या घटनांची माहिती मिळाल्‍यानंतर कळंबोली आणि खारघर येथून अग्निशमन विभागाचे कर्मचारी रवाना होतात; मात्र हे अंतर लांब आहे. तक्रार मिळाल्‍यानंतर घटनास्‍थळी अग्निशमन विभागाची वाहने पोहोचेपर्यंत सुमारे अर्धा तासांचा कालावधी जात आहे. या कालावधीत आगीच्‍या दुर्घटनेत मोठी हानी होत आहे. घरातील साहित्‍य जळून खाक होऊन आर्थिक नुकसान होत आहे.
-----------------
तळोजा वसाहतीत गेल्या दोन वर्षांत सहा ते सात वेळा आगीच्या घटना घडल्या आहेत. वाढत्या विकासामुळे लोकसंख्येत वाढ होत असून
आगीच्‍या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्‍या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी या परिसरात अग्निशमन केंद्र सुरू झाल्‍यास वेळेत मदत पोहोचेल. त्‍यामुळे होणारे नुकसान टळेल.
- प्रसाद पाटील, पदाधिकारी, शेकाप, तळोजा
------------------
मेट्रोमुळे शाळा, दुकानांत वाढ
बेलापूर-पेंधर मेट्रो रेल्वेमुळे तळोजा वसाहतीच्या विकासात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तळोजा वसाहतीत मेट्रो कारशेड त्याचबरोबर पेठाली आणि पेंधर ही दोन मेट्रो स्थानके आहे. बँक शाखा, तसेच शाळांच्या संख्येतही वाढ होत आहे. शोरूम, मोबाईल दुकाने, ज्वेलर्ससह हॉटेल आणि दुकानात दिवसेंदिवस भर पडत आहेत. परिसरात आगीची घटना घडल्यास कळंबोली आणि खारघर अग्निशमन केंद्रातून अग्निबंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचण्यास अर्धा तास लागत असल्यामुळे आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्त हानी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com