रस्त्यासाठी ६८ झाडांवर कुऱ्हाड
रस्त्यासाठी ६८ झाडांवर कुऱ्हाड
जगदांबा माता मंदिरापर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौक ते जगदांबा माता मंदिरापर्यंत पोहोच रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. या ५०० ते ६०० मीटर रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ६८ झाडे आहेत. ही झाडे तोडण्यासाठी एमएमआरडीएने कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाकडे परवानगी मागितली आहे. ही झाडे तोडण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने हरकती मागविल्या आहेत. त्यानंतर झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे.
डोंबिवली पश्चिमेला विविध विकासकामे, रिंग रूट प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. गोपीनाथ चौक ते जगदांबा माता मंदिरापर्यंतच्या पोहोच रस्त्याचे काम सध्या या परिसरात सुरू आहे. हा रस्ता टिटवाळा, कल्याण ते डोंबिवली, २७ गाव बाह्यवळण रस्त्याला जोडणारा आहे. या मार्गात ६८ झाडे बाधित होत आहेत. ही झाडे तोडण्याची परवानगी एमएमआरडीएने मागितली आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने एमएमआरडीएच्या प्रस्तावाप्रमाणे प्राधिकरणाकडून प्रति झाड शुल्क आणि तोडण्यात येणाऱ्या प्रति झाड सुमारे २५ झाडे लावण्यासाठीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या स्वाक्षरीने गोपीनाथ चौक ते जगदंबा माता मंदिर रस्त्यावरील झाडे तोडण्यासाठी कोणाची हरकत, सूचना असेल तर आपली नोंद पालिकेत करावी, यासाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक झाडाच्या खोडावर या नोटिसा लावल्या आहेत.
डोंबिवली परिसरातील पॅकेज पाचअंतर्गत विविध रस्त्यांची कामे करायची आहेत. या रस्ता रुंदीकरण आणि रस्ते बांधकामात एकूण ६८ झाडे बाधित होणार आहेत. ही झाडे तोडणे किंवा योग्य झाडांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंत्यांनी पालिकेकडे मागितली आहे. ही झाडे तोडण्यास कोणाची काही हरकत असेल तर त्यांनी सात दिवसांच्या आत आपली हरकत पालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण समितीसमोर लेखी स्वरूपात मांडावी. मुदतीत हरकती दाखल न केल्यास ही झाडे तोडणे, पुनर्रोपणास परवानगी देण्यात येईल याची संबंधितांनी दखल घ्यावी, असे जाहीर नोटिसमध्ये म्हटले आहे.
आंबा, पेरू, रानचिंच, फणसाचा समावेश
तोडण्यात येणाऱ्या झाडांमध्ये नारळ, आंबा, पेरू, रानचिंच, जांभूळ, फणस अशा प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. हा महत्त्वपूर्ण रस्ता मार्गी लागणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गोपीनाथ चौक ते जगदांबा माता मंदिर, गरिबाचा पाडा ते अनमोल नगरी वळण पोहोच रस्ता, कुंभारखाणपाडा ते वळण रस्ते, सत्यवान चौक ते स्मशानभूमी हे बाह्य वळण रस्त्याला जोडणारे डोंबिवली पश्चिमेतील पोहोच रस्ते आहेत. या पोहोच रस्त्यांमुळे येत्या दोन वर्षांत डोंबिवली पश्चिमेतील वाहनचालकांना डोंबिवली पूर्व, रेल्वे स्थानक भागात न येता वळण रस्त्याने कल्याण, भिवंडी, ठाण्याकडे जाणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

