सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील ओपन जिम नादुरुस्त

सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील ओपन जिम नादुरुस्त

Published on

सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील ओपन जिम नादुरुस्त
नागरिकांच्या तक्रारींकडे महापालिकेचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील ओपन जिममधील व्यायाम साहित्य अनेक महिने नादुरुस्त अवस्थेत आहे. या जिमची महापालिकेकडून कोणतीही देखभाल केली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वर्षभरापासून जिममधील अनेक उपकरणे मोडकळीस झाली आहेत. काही उपकरणांचे नटबोल्ट निघाले असून, काहींची पॅडल्स गायब झाल्याने व्यायाम करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

जिममध्ये नियमितपणे व्यायाम करणारे, विशेषतः ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. जमिनीवर उभे असलेले लोखंडी खांबदेखील हलत असल्याने दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. यासंदर्भात नागरिकांनी महापालिका कार्यालयात तोंडी व लिखित स्वरूपात तक्रारी केल्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेचे अधिकारी वेळोवेळी या संकुलात येऊनही परिस्थितीकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप स्थानिक शिवसेना पदाधिकारी राजू नलावडे यांनी केला आहे.

ज्येष्ठ नागरिक सुनील शेवडे यांनी तब्बल सहा महिन्यांपूर्वी लिखित तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, परंतु आता संबंधित अधिकारी फोनही उचलत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरे ज्येष्ठ नागरिक अनिल सुदामे यांनीही अनेक वेळा तोंडी तक्रारी करून नाराजी व्यक्त केली आहे. ओपन जिमचे काही वर्षांपूर्वी मोठ्या उत्साहात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते.

वापरण्यास अयोग्य
महापालिकेकडून त्याची देखभाल-दुरुस्ती न झाल्याने संपूर्ण जिम वापरण्यास अयोग्य ठरत आहे. शहरात कोट्यवधींचे प्रकल्प राबवणारे आणि स्मार्ट सिटीची भाषा करणारे लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन दुरुस्तीदेखील करू शकत नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. अशा तीव्र शब्दांत नलावडे यांनी टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com