ठाण्यात एसआरए घोटाळा
ठाण्यात एसआरए घोटाळा
सार्वजनिक शौचालये, मुताऱ्यांवर झोपडीचा शिक्का : खारटन रोडच्या नागसेननगरमधील प्रकार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५- झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे ‘लाभार्थी’ होण्यासाठी काही गावगुंडांनी सरकारी यंत्रणेला हाताशी धरून चक्क सार्वजनिक शौचालये, मुताऱ्या झोपड्या म्हणून दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या खारटन रोड परिसरातील नागसेन नगर येथे हा प्रकार घडला आहे. यासाठी कथित गृहनिर्माण संस्थेने पदाधिकाऱ्यासह रहिवाशांचे बोगस अर्ज व सह्यांचा प्रस्ताव एसआरए प्राधिकरणाकडे दाखल केला आहे. नागसेन नगर रहिवासी संघर्ष समितीने जनता दरबारात हे प्रकरण नेल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला आहे.
ठाणे शहराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून खारटन रोड ओळखला जातो. ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमजवळ असलेल्या या परिसरातील नागसेन झोपडपट्टीत एसआरए प्रकल्प राबवण्याचे प्रस्तावित आहे. तसा प्रस्तावही प्राधिकरणाकडे सादर केला असून, झोपडीधारकांचे सर्वेक्षण करून झोपड्यांवर क्रमांक टाकण्याचे काम सुरू आहे. नकाशानुसार या भूखंडावर सुमारे ७१६ झोपड्या आहेत; मात्र झोपू योजनेसाठी प्रस्ताव दाखल करणाऱ्या संस्थेने चक्क ७४८ झोपड्या असल्याचे दाखवले आहे. प्रस्तावातील सुमारे ३२ झोपड्या या भूखंडाबाहेरील असल्याचा दावा नागसेननगर संघर्ष समितीने केला आहे. नंतर ही संख्या वाढून ८०० च्या घरात गेली आहे.
पुनर्वसन प्रकल्पात सदनिका मिळवण्यासाठी काही गावगुंडांनी या भागातील सार्वजनिक शौचालय, मुतारी आणि ठाणे महापालिकेच्या सामाजिक हॉल, फायलेरिया हजेरी शेडला पत्रे लावून त्यावर एसआरएच्या मार्फत क्रमांक टाकण्याचा कारनामा केला आहे. त्यासाठी सार्वजनिक शौचालयांना टाळे ठोकून ते बंद केले आहेत. असे असतानाही ठेकेदाराला मात्र साफसफाईचे बिल मागील तीन महिन्यांपासून दिले जात आहे. बेकायदेशीर शौचायले बंद करून झोपडीच्या नावे वास्तू हडपल्याचा साधा अहवालदेखील स्वच्छता निरीक्षक यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी अतिक्रमण विभागाला दिला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे पालिकेचा बेजबाबदार कारभारही यानिमित्ताने समोर आला आहे. या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी नुकतीच वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात केली होती, परंतु अद्यापि कोणतीच कारवाई झाली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
गृहनिर्माण संस्था संशयाच्या भोवऱ्यात
एसआरए प्रकल्प राबवण्यासाठी भारतरत्न सहकारी गृहनिर्माण संस्थेने प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू केला आहे, पण ही संस्था आणि निवड केलेले पदाधिकारीच बोगस असल्याचा दावा येथील रहिवाशांनी केला आहे. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मे २०२४ च्या सभेचे बोगस कागदपत्रे तयार करून त्यावर झोपडीधारकांच्या खोट्या सह्यांचे प्रस्ताव सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. ८०० पैकी २०० झोपडीधारक या सभेला हजर असताना प्रत्यक्षात ६१२ झोपडीधारक हजर असल्याचे या सभेच्या मिनिट्समध्ये दाखवण्यात आल्याची माहिती नागसेननगर संघर्ष समितीचे सुभाष ठोंबरे, नरेश पारचे, मनोज ढकोलिकाया, बाबू भाईर यांनी दिली.
ठाणे पालिकेचेही दुर्लक्ष
नागसेननगर एसआरए प्रकल्पातील गैरव्यवहारात प्राधिकरणाचे अधिकारीही सहभागी असल्याचा संशय व्यक्त होत आहे, पण त्यासोबतच पालिकेचेही याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर पालिकेची सार्वजनिक शौचालये, हॉलचे रूपांतरण झोपड्यांमध्ये करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पत्र एसआरए विभागाने ३ मार्च रोजी दिले होते, अशी माहिती प्राधिकरणाच्या अधिकारी मिनल पालांडे यांनी दिली. पुन्हा पालिकेला स्मरणपत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

