मराठी बोलण्यास बंदी घालणाऱ्या शाळांवर होणार कारवाई
मराठी बोलण्यास बंदी घालणाऱ्या शाळांवर कारवाई
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत बोलण्यास मनाई केल्याचा गंभीर प्रकार समोर आला. मनविसेने शिक्षण विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. त्याची तत्काळ दाखल घेत शिक्षण विभागाने सर्व शाळांना सक्त आदेश काढले आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजीत बोलण्यास सक्ती केल्यास संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर मराठी भाषेचा वापर न करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याबाबत मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी मनविसे शिष्टमंडळासह २ एप्रिलला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार सादर केली होती. काही सीबीएसई/आयसीएसई माध्यमाच्या शाळांमध्ये वर्गात, आवारात आणि उपक्रमांत मराठीत बोलल्यास विद्यार्थ्यांना अपमानित केल्याचेही सांगण्यात आले होते. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी अधिकृत आदेश काढला. या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक, माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मराठीतून संवाद साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
फक्त मराठी विषयापुरते भाषेचे शिक्षण न देता, इतर सर्व उपक्रमांमध्येही विद्यार्थ्यांनी मराठीचा वापर करावा, असे आदेशात नमूद आहे. शासन निर्णय १३ डिसेंबर २०२३ अन्वये, शाळांमध्ये मराठी ही अध्यापनाची अनिवार्य भाषा असून, तिचा वापर रोजच्या संवादात, चर्चासत्रात, नाट्य व भाषण स्पर्धांमध्ये तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये होणे आवश्यक आहे, परंतु काही शाळा या निर्णयाला डावलून विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्यास प्रवृत्त करत आहेत. याचा थेट परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांना मातृभाषेचा आत्मविश्वास गमवावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान, इतिहास यांसारखे विषय इंग्रजीतून शिकले तरी संवादासाठी मराठी भाषा आवश्यक आहे, असे मनविसेच्या निवेदनात म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

