ठाणेकरांवर पाणी टंचाईचे सावट
पाणीटंचाईचे ठाणेकरांवर सावट
धरणांचा पातळी घटली, पालिकेचे नागरिकांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : वातावरणातील बदलांमुळे गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. त्यात ठाणे शहरातील तापमानदेखील ४० अंश सेल्सियस झाले आहे. अशातच वाढत्या उष्णतेमुळे धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन ठाणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या समस्या तीव्र होत असताना, आता शहरी भागातदेखील पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. ठाणे शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. या भागात मोठमोठी निवासी गृहसंकुले उभे राहू लागली आहेत. दरम्यान, ठाणे पालिकेला येथे नागरी सुविधा पुरवताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या ठाणे शहराला चार स्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. पण नव्याने विकसित झालेल्या भागातील इमारतींमुळे अतिरिक्त पाण्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने भातसा धरणातून १०० दशलक्ष लिटर, तर मुंबई पालिकेकडून २० दशलक्ष लिटर वाढीव पाणी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेट या भागांना वाढीव पाणी देण्यासाठी जलवाहिनी जोडणीची कामे हाती घेतली आहेत. मात्र अनेक भागांत पाणी नसल्याने पालिकेला टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे.
-----------------------------------------------------
पालिकेचे नागरिकांना आवाहन
- ठाणे महापालिका क्षेत्रात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे. त्यानुसार बोअरवेलच्या पाण्याने ओल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात, अंगणात शक्यतो पाणी मारू नये, नळ सुरू ठेवून कपडे धुणे, भांडी घासणे, दाढी करणे टाळावे, घरातील नळांची गळती दुरुस्त करावी तसेच सोसायटीतील गळकी टाकी, पाइप, व्हॉल्व दुरुस्त करावेत.
- इमारतीच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास अथवा तसे आढळून आल्यास संबंधित इमारतीचे/सोसायटीचे नळ कनेक्शन खंडित करण्यात येईल. शक्यतो रोज आंघोळीसाठी शॉवर व बाथटबचा वापर करू नये. स्वच्छतागृहामध्ये डुअल फ्लशचा वापर करावा. इमारतीतील जिने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये. पाण्याचा अनावश्यक साठा करू नये. पाणी अनमोल आहे, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा, पाणी वाचवा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

