मिरगुंडी, पापडाने जेवणाला स्वाद
मुरलीधर दळवी ः सकाळ वृत्तसेवा
मुरबाड ता. १७ ः उडीद डाळीच्या पिठात आयुर्वेदिक वनस्पतीपासून तयार केले जाणारे गुळीचे पाणी मिसळून तयार केली जाणारी मुरबाड तालुक्यातील चविष्ट मिरगुंडी, पापड सध्या ठाणे जिल्ह्यासह मुंबई भागात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या पापड, मिरगुंडी तयार करण्याच्या कामात गृहिणी मग्न झाल्या असून, जेवणातील स्वाद वाढला आहे.
शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणासोबत पापड, मिरगुंडी तेलात तळून दिली जातात. उडीदाच्या डाळीचे पिठ तयार करताना उडीद डाळीमध्ये मिरी, पापड खार, हिंग, सुंठ मिसळले जातात. हे पीठ मळताना त्यामध्ये गुळींचे पाणी टाकून पापड, मिरगुंडी हा पदार्थ तयार केला जातो. आयुर्वेदिक वनस्पतीपासून तयार करण्यात आलेले गुळीचे पाणी मिसळून मुरबाड तालुक्यात पापड, मिरगुंडी तयार केली जाते. या पदार्थाला एक विशिष्ट अशा चवीमुळे त्यांना खास मागणी असते. मुरबाड तालुक्यात काही ठिकाणी पापड, मिरगुंडी तयार करण्याचा व्यवसाय केला जातो. सध्या पापड व मिरगुंडीचा भाव प्रतिकिलो ३०० रुपये, तर मीठ पाणी घालून तयार केलेल्या पापड, मिरगुंडीचा भाव २६० रुपये असल्याचे पापडविक्रेते आनंद मुरबाडे यांनी सांगितले.
-------------------------------------------
माहेरी गेलेल्या मुलींना भेट
तालुक्यातील मुली लग्न होऊन सासरी जातात. त्यांना माहेरातून पापड, मिरगुंडी, कुरडई, खारोड्या, असे उन्हाळ्यात तयार केले जाणारे व वर्षभर टिकणारे पदार्थ तयार करून भेट म्हणून पाठवले जातात. पावसाळ्यात विशेषतः श्रावण महिन्यात मांसाहारी पदार्थ भोजनातून वर्ज्य केले जातात. अशा वेळी चवीसाठी व उपवास सोडण्यासाठी जेवताना भात, भाकरी, भाजीबरोबर पापड, मिरगुंडी, कुरडई, खारोडी, असे पदार्थ जेवणात समाविष्ट केले जातात. पालेभाज्या उपलब्ध होत नसल्यामुळे पापड, मिरगुंडी गृहिणीच्या मदतीला येतात.
-------------------------------------
गुळीच्या पाण्याला महत्त्व
गुळीचे पाणी तयार करण्यासाठी उडीद, घेवडा, डांगर या वनस्पतीचे वेल, खुरासणीच्या रोपांच्या काड्या, पांढरा आघाडा, बासर बोंडा, रुईचे फुल, काटेरी साबराच्या झाडाचे तुकडे, टेटराच्या झाडाची साल एकत्रितरित्या भाजून त्याची राख तयार केली जाते. नंतर ती राख पाण्यामध्ये उकळवून चवीनुसार मीठ टाकून गुळीचे पाणी तयार केले जाते.
------------------------
उडदाच्या डाळीच्या पिठामध्ये आयुर्वेदिक वनस्पतीपासून तयार करण्यात आलेले गुळीचे पाणी मिसळून मुरबाड तालुक्यात पारंपरिकरित्या पापड, मिरगुंडी तयार केली जातात. या पदार्थाला एक विशिष्ट अशी चव आहे. त्यामुळे त्यांना खास मागणी असते.
- सुवर्णा हंडोरे, गृहिणी, भादाने गाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.