

जागतिक यकृतदिन
दुर्मिळ आजाराने त्रस्त महिलेवर यकृत प्रत्यारोपण
केईएम रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : केईएम रुग्णालयात एका ४० वर्षीय महिलेवर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही महिला विल्सन या दुर्मिळ आनुवंशिक आजाराने त्रस्त होती. आर्थिक परिस्थिती कमजोर असलेल्या या महिलेवर केंद्र सरकारच्या दुर्मिळ आजार उपचार निधीतून ही शस्त्रकिया करण्यात आली. या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नालासोपारा पूर्वेला राहणाऱ्या वर्षा सपकाळे या घरकाम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावतात, तर त्यांचे पती विजय हे केशकर्तनालयात काम करून उदरनिर्वाह चालवतात. विल्सन या दुर्मिळ आजारावर यकृत प्रत्यारोपण हाच पर्याय आहे. त्यानंतरच हा आजार पूर्ण बरा होण्यास मदत होते. विजय सपकाळे म्हणाले, की जानेवारीत तिला कावीळ झाली होती. प्रथम त्यांनी कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेतले. १५ दिवस उपचारांनंतर प्रकृतीत सुधारणा झाली; मात्र महिन्यानंतर भूक न लागणे, उलट्या होणे आणि शरीर पिवळे पडणे अशी लक्षणे पुन्हा दिसू लागली. ९ मार्चला आम्ही पुन्हा कस्तुरबा रुग्णालयात तिला घेऊन गेलो. तेथील डॉक्टरांनी काविळीने गंभीर स्वरूप धारण केल्याचे सांगितले आणि नायर रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. नायर रुग्णालयात तपासणीत तिच्या पोटात पाणी साचल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी तिला ‘विल्सन’ हा दुर्मिळ आजार जडला आहे. या आजारामुळे तिचे यकृत खराब झाले असून, प्रत्यारोपणाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
२६ मार्चला वर्षा यांना केईएम रुग्णालयात आणण्यात आले. यकृत प्रत्यारोपणासाठी अवयवदानाच्या यादीत तिचे नाव नोंदवण्यात आले होते; पण त्याच वेळी तिच्या पती आणि मुलीचीही तपासणी करण्यात आली. मुलगी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे आढळले आणि ती यकृत दान करण्यास तयार होती. ३० मार्चला रुग्णालयाकडून माहिती मिळाली की एका अवयवदात्याकडून यकृत उपलब्ध आहे. त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता शस्त्रक्रिया करण्यात आली. सहा तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. ही महिला आयसीयूमध्ये असून, तिची प्रकृती स्थिर आहे. तिला पूर्णपणे बरे होण्यासाठी काही दिवस लागतील, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. रुग्णालयाने एकही रुपया न घेता शस्त्रक्रिया केल्याचे सांगत पती विजय यांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.
------------------
या आजारात तांब्याचे प्रमाण वाढते!
विल्सन हा एक आनुवंशिक आजार आहे. यामध्ये शरीरात तांब्याचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढते. यकृत प्रत्यारोपणानंतर हा आजार पूर्णपणे बरा होतो. केईएमसह ११ रुग्णालयांना केंद्र सरकारने देशातील दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी अधिकृत केले आहे, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्रमुख
डॉ. आकाश शुक्ला यांनी दिली.
---------------------------
आतापर्यंत दोन रुग्णांवर प्रत्यारोपण
केईएमने या आजाराने ग्रस्त असलेल्या दोन रुग्णांवर यशस्वी प्रत्यारोपण केले आहे. गेल्या वर्षी एका आठ वर्षांच्या मुलावर आणि आता ४० वर्षांच्या महिलेवर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले आहे, असे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.