पनवेलमधील हवेचा दर्जा सुधारणार

पनवेलमधील हवेचा दर्जा सुधारणार

Published on

पनवेल, ता. १९ (बातमीदार) : वाढत्या धूळ प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी पनवेल महापालिकेच्या पर्यावरण विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. महापालिकेने पालिका कार्यक्षेत्रात चार सूक्ष्म धूळ नियंत्रण करणारी यंत्रे (फॉग कॅनन वाहने) कार्यरत केली असून, या वाहनांद्वारे चारही प्रभागामध्ये दररोज धूळ प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. याबरोबरच हवेतील प्रदूषणाची गुणवत्ता निरीक्षण करण्यासाठी मोबाईल एअर क्वालिटी मॉनिटरींग व्हॅन कार्यरत आहे. या वाहनाद्वारे दैनंदिन हवा प्रदूषण गुणवत्ता पातळी तपासली जात आहे.
पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार महापालिका कार्यक्षेत्रातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापराबरोबरच जनजागृतीदेखील करण्यात येत आहे. बेकरी युनिट्सना लाकूड व कोळशाचा वापर थांबवणे आणि सीएनजी गॅस किंवा विद्युत तंदूर वापरण्यासाठी आतापर्यंत १५१ नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागस्तरीय हवा प्रदूषण नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचबरोबर भरारी पथकेसुद्धा तयार करण्यात आली आहेत.
-------------
नागरिकांमध्ये जागृती
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात धूळ प्रदूषणाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि विविध मोहिमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने माहिती, शिक्षण आणि संवाद वाहन सुरू करण्यात आले आहे. या वाहनामार्फत पर्यावरणविषयक माहिती, माझी वसुधंरा अभियान, प्लॅस्टिक बंदी जनजागृती, प्रदूषण नियंत्रणविषयक विविध मोहिमा, पर्यावरणपूरक सण-उत्सव याबाबतची माहिती प्रसारित करून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
---------------
बांधकामांसाठी मार्गदर्शक सूचना
पनवेल महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या १६४ बांधकाम विकसक, व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी धूळ प्रतिबंधासाठी हिरवे पडदे, धातूचे पत्रे लावण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
--------
धूळ प्रदूषण नियंत्रणाकरिता उपाययोजना
१. पनवेल महापालिकेच्या सर्व प्रभाग क्षेत्रामध्ये हवेची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून हवा शुद्धीकरण यंत्रे (Air Purification Systems) स्थापन करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे, पनवेलमधील विविध १० ठिकाणी ही हवा शुद्धीकरण यंत्रे बसविण्यात येणार आहेत.
२. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) तपासण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, तापमान व पर्जन्यमान इत्यादी घटकांचे निरीक्षण करणे व हवेच्या गुणवत्तेबद्दल नागरिकांना अचूक माहिती देण्यासाठी सात ठिकाणी रिअल टाइम ॲम्बीएंट एअर क्वालिटी मॉनिटर ॲण्ड डिस्प्ले बोर्ड स्थापन करण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com