नंदुरबारच्या ५ वर्षाच्या भाजलेल्या मुलावर डॉक्टरांनी केल्या अनेक शस्त्रक्रिया, केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली जगण्याची नवी उमेद

नंदुरबारच्या ५ वर्षाच्या भाजलेल्या मुलावर डॉक्टरांनी केल्या अनेक शस्त्रक्रिया, केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली जगण्याची नवी उमेद
Published on

जळाल्याने मान आखडली, हात झाले वाकडे, तोंड होते बंद
नंदुरबारच्या पाच वर्षांच्या भाजलेल्या मुलावर केईएममध्ये यशस्‍वी शस्‍त्रक्रिया
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राहत्या घरात लागलेल्या आगीत जळाल्याने पाच वर्षांच्या आदित्यची सर्वसामान्य आयुष्य जगण्यासाठी एक वेगळी लढाई सुरू होती. १९ फेब्रुवारी २०२४ या दिवशी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एका घरात आदित्य आणि त्याचा मित्र खेळता खेळता आग लागली. घर चाऱ्याचे असल्याने आगीने मोठा पेट घेतला. या आगीत आदित्य जवळपास ४० टक्के होरपळला होता. जळाल्याने मान आखडली, हात वाकडे, तोंड बंद झाले होते. आदित्‍यवर अनेक शस्‍त्रक्रिया करून केईएम रुग्‍णालयातील डॉक्‍टरांनी जगण्याची नवी उमेद दिली.
आदित्यचे वडील गजानन पावरा आणि त्यांची पत्नी हे दोघेही घटना घडली तेव्हा शेतात काम करीत होते. घरी आल्यानंतर त्यांनी आदित्यला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तीन महिन्यांच्या उपचारांनंतर तिथल्या डॉक्टरांनी मुंबईत नेण्याचा सल्ला दिला. उपचारांना उशीर झाल्याने आदित्यची भाजलेली त्वचा एकमेकांना चिकटत गेली. तो त्याच गंभीर अवस्थेत ३ सप्टेंबर २०२४ या दिवशी परळच्या केईएम रुग्णालयात दाखल झाला. अंगावर चादर टाकून योग्य उपचार मिळतील या आशेने त्याचे आई-वडील त्याला रुग्णालयात घेऊन आले. डॉक्टरांनी गेल्या आठ महिन्यांत त्याच्यावर वेगवेगळ्या आणि अनेक शस्त्रक्रिया केल्या. शरीराला चिकटलेली त्याची मान शस्त्रक्रियेने वेगळी केली. वाकडे झालेले हात सरळ करीत हातांना त्राण आणण्यास मदत केली. बंद झालेले कान आणि तोंड उघडल्यामुळे आता आदित्य स्वत: खात-पित आहे.
भाजण्याच्या घटना घडल्यानंतर पहिल्यांदा बर्न सेंटरमध्ये जाणे गरजेचे असते. मुंबईपेक्षा राज्यातील इतर जिल्ह्यातून अशा गंभीर स्वरूपाचे रुग्ण दाखल होतात, अशी प्रतिक्रिया केईएम रुग्णालयाच्या प्लॅस्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. विनिता पुरी यांनी दिली. आदित्‍यचे वडील गजानन पावरा यांनी केईएमच्या डॉक्‍टरांचे आभार मानले.

खासगी रुग्‍णालयातील खर्च आवाक्याबाहेर
जळालेली त्वचा, आखडलेली मान, बंद कान व तोंड यासह वाकडे आणि आखडलेले दोन्ही हात या वेगवेगळ्या शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयात किमान २५ लाख रुपये खर्च येऊ शकतो. पण केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अनेक दात्यांनी दिलेल्या निधीतून आणि पीबीसीएफ फंडातून आदित्यचे उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या.

दरवर्षी सरासरी ७०० रुग्ण
प्लॅस्टिक सर्जरीच्या एका ओपीडीत सरासरी सात रुग्ण छोटी-मोठी भाजण्याची तक्रार घेऊन येतात. असे वर्षाला किमान ७०० रुग्ण दाखल होतात. त्यापैकी वर्षाला किमान पाच ते सहा रुग्ण अधिक गंभीर अवस्थेत येतात, ज्यांच्या उपचारांसाठी डॉक्टरांची ही परीक्षा असते. आठवड्यातून दोनदा प्लॅस्टिक सर्जरी ओपीडी असते.

कोणत्याही भाजलेल्या रुग्णासाठी व्यंग विकृती ही भयानक असते. भाजलेली व्यक्ती किमान समाजात सामान्यपणे जगू शकते, याकडे आम्ही लक्ष देतो. त्यांना मानसिक आणि शारीरिक दोन्ही उपचार देणे आवश्यक असते. आदित्यच्या हातांसाठी वर्षभरासाठी प्रेशर गारमेंट दिले आहेत. त्यातून हात पुन्हा आखडणार नाहीत. त्याला पुढेही उपचारांची गरज आहे.
- डॉ. विनिता पुरी
प्लॅस्टिक सर्जरी विभागप्रमुख, केईएम रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com