

लाकडावरील भट्ट्या बंद होणार
महापालिकेची बेकरीचालकांना सहा महिन्यांची मुदत
कल्याण, ता. २६ (बातमीदार) : हवा प्रदूषण रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील बेकरीचालकांना लाकडाची भट्टी वापरण्याऐवजी इलेक्ट्रिक भट्टी वापरण्याची सूचना केली आहे. यासाठी दोन्ही उपनगरांतील ४५ हून अधिक बेकरीचालकांची बैठक महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील सभागृहात शुक्रवारी (ता. २५) रोजी पार पडली आहे. या वेळी उपस्थित बेकरीचालकांनी येत्या सहा महिन्यांपर्यंतची मुदत मागितली आहे. या कालावधीत हे बेकरीचालक लाकडावर चालणाऱ्या भट्टीवरून इलेक्ट्रिक भट्टीवर स्थलांतरित होणार आहेत.
जलप्रदूषणाबरोबच वायू प्रदूषणही आता कल्याण-डोंबिवली या उपनगरांत वाढीस लागले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ‘समीर’ या मोबाईलवर कल्याण शहराचा रोजचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा १०० ते १२५ दरम्यान राहत असल्याचे आढळले आहे. यात सातत्याने वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे या वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर शहरातील हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका पुढे सरसावली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात शहरातील बेकरीचालकांच्या लाकडावर चालणाऱ्या भट्ट्या बंद करण्याकडे महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.
निवासी भागात बेकऱ्या
बेकरीचालक खारी, पाव, बटर, टोस्ट, केकच्या निर्मितीसाठी भट्टी वापरतात. या भट्टीत लाकडे टाकून धग निर्माण केली जाते. यातून लाकडे जळून निर्माण होणारा धूर हा बेकरीवरील छोट्या धुरांड्यातून थेट हवेत सोडला जातो. यामुळे हवेत थेट वायू प्रदूषण होते, तसेच निवासी भागातही धूर पसरतो. यावर तोडगा काढण्यासाठीच कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या पर्यावरण विभागाने बेकरीचालकांना लाकडावर चालणाऱ्या भट्टीवरून इलेक्ट्रिक भट्टीवर स्थलांतरित होण्याची विनंती केली आहे. ज्यामुळे धूर न होता शहरी वायू प्रदूषणाला आळा बसणार आहे.
सहा महिन्यांची मुदत
महापालिकेने बोलावलेल्या बैठकीला कल्याण-डोंबिवलीतील ४५च्या आसपास बेकरीचालक उपस्थित होते; मात्र त्यांची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, लाकडावर चालणाऱ्या भट्टीवरून इलेक्ट्रिकचा पर्याय निवडायचा असेल तर त्यासाठी मोठे इलेक्ट्रिक ओव्हन या बेकरीचालकांना मागवावे लागणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक ओव्हनची मागणी नोंदवली तर कमी कालावधीत कल्याण-डोंबिवलीतील सर्व बेकरीचालकांना ओव्हन मिळतील का, हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. त्यामुळे या बैठकीला उपस्थित असलेल्या बेकरीचालकांनी महापालिकेकडे सध्या सहा महिन्यांची मुदत मागितली आहे. या सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने हे बेकरीचालक लाकडी भट्टीवरून इलेक्ट्रिक भट्टीवर स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.