

कल्याणमध्ये मॉन्सूनपूर्व आढावा बैठक
कल्याण (वार्ताहर) : महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात मॉन्सूनपूर्व तयारीसंदर्भातील आढावा बैठक शुक्रवारी (ता. २५) पार पडली. या बैठकीत शहरातील विविध प्रभागांमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांबाबत सखोल चर्चा झाली. या बैठकीत आयुक्तांनी लवकरात लवकर नालेसफाई पूर्ण करून त्यामध्ये वाढलेला गाळ प्राथमिक टप्प्यातच उचलण्याचे निर्देश दिले. तसेच मोठ्या व मध्यम नाल्यांबरोबरच लहान गटारांच्या जवळ दैनंदिन स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले. पावसाचे पाणी ज्या भागांमध्ये साचते असे भाग लक्षात घेऊन त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र प्रभाग पातळीवर विशेष पथक तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यामुळे पावसाळ्यात महापालिका क्षेत्रात पाणी साचण्याच्या समस्या कमी होतील, असे आयुक्तांनी सूचित केले. महापालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी या सूचनांची अंमलबजावणी तत्काळ सुरू करावी, असे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
....................
कल्याणमध्ये भ्याड हल्ल्याचा निषेध
कल्याण (वार्ताहर) : शहरातील विविध राजकीय पक्ष व नागरिकांच्या वतीने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात गुरुवारी (ता. २४) कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच दहशतवाद्यांना भारतातून समूळ नष्ट करावे, यासंदर्भात राष्ट्रपती यांना कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. ‘हम सब एक हैं, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद’ अशी घोषणा देत हा कॅन्डल मार्च कल्याण पश्चिममधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत काढण्यात आला. या वेळी माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जगताप, नोवेल साळवे, विजय पंडित, रूपेश भोईर, सत्यभामा जयस्वार, संतोष रोकडे, प्रवीण गुंजाळ, रामदास वळसे पाटील, राजू पांडे, विशाल दामले, अशोक राजपूत, कुसुम गेडाम आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
.............
एमआयडीसी भागात वीजपुरवठा वारंवार खंडित
कल्याण (वार्ताहर) : एमआयडीसी निवासी भागात सुदर्शननगरमधील ओमअगत्य सोसायटीसमोर नवीन नाले, गटारांचे काम एमआयडीसी ठेकेदारांकडून केले जात आहे. हे काम चालू असताना महावितरणच्या वीज केबलला काही ठिकाणी धक्का लागल्याने त्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे तीन दिवसांपासून ओमअगत्य सोसायटीजवळील अंदाजे दहा, बारा इमारतींना वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महावितरणकडे सोमा नायर व इतर नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. शुक्रवारी (ता. २५) सकाळपासून येथील केबलमधून धूर येऊ लागल्याने येथील नागरिकांनी पुन्हा महावितरणकडे तक्रार केली आहे. आता येथे नवीन केबल टाकावी लागणार आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. एमआयडीसी निवासी भागात सध्या नवीन नाले, गटारे, सांडपाणी वाहिन्यांचे काम एमआयडीसी ठेकेदारामार्फत जोरात चालू आहे. कामाच्या वेळी वीज, पाणी इत्यादी वाहिन्यांना धक्का बसल्याने त्या नादुरुस्त होत आहेत. एमआयडीसी ठेकेदार आणि महावितरण यांच्यात समन्वय नसल्याने त्याचा फटका येथील नागरिकांना बसत आहे.
.............
शिवमुद्रा नृत्यालयाचा वार्षिक मेळावा
कल्याण (वार्ताहर) : शिवमुद्रा नृत्यालयाचा वार्षिक सांस्कृतिक मेळावा कल्याणमधील के. सी. गांधी हायस्कूलच्या ऑडिटोरियममध्ये नुकताच पार पडला. शिवमुद्रा नृत्यालयाच्या डोंबिवली शहरात एकूण तीन शाखा असून या नृत्यालयात आजपर्यंत शेकडो विद्यार्थिनींनी शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. दरवर्षी प्रशिक्षित आणि नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थिनींसाठी या वार्षिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. त्यात त्यांना आपल्या नृत्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. नृत्यालयाच्या संचालिका राधिका कुलकर्णी पंड्या यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षित विद्यार्थिनींना शास्त्रीय नृत्याचे सादरीकरणाची संधी मिळावी, या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शासणे यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात १५ नृत्य प्रकार सादर करण्यात आले. त्यात भरतनाट्यमद्वारे अबीर गुलाल (अभंगम्), कावडी चिंदू, गणपती कौतवम, पुष्पांजली भरतनाट्यम हुला हुप, दशावतार तसेच शिवधनुष्य प्रसंग आणि शेवटी सीता स्वयंवर असे विविध नृत्य प्रकार सादर केले. या वेळी विशेष पाहुण्या कलाकार म्हणून मीरा महाजन आणि शमिका पालेकर यांनी विशेष कथ्थक नृत्य सादर केले.
..................
कल्याणमध्ये दहशतवादी हल्ल्याचा निषेध
कल्याण (वार्ताहर) : अधिवक्ता परिषदेच्या वतीने पहलगाम येथे भारतीय नागरिकांवर दहशतवादी संघटनांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. गुरुवारी (ता. २४) सायंकाळी कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध आंदोलन केले. अधिवक्ता परिषद संघटनेने केंद्र व जम्मू-कश्मीर प्रशासनाकडे देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली. याबाबत मागणीपत्र कल्याण तहसीलदार यांना देण्यात आले. या वेळी अधिवक्ता परिषद कल्याण तालुका संघटनेचे तालुकाध्यक्ष ॲड. प्रल्हाद भिलारे, ॲड. सतीश अत्रे, ॲड. अर्चना सबनीस, वरिष्ठ अधिवक्ता के. टी. जैन, ॲड. रेखा कांबळे, ॲड. पूजा भालेराव, ॲड. नरेंद्र बोन्द्रे, ॲड. नागेश कांबळे, ॲड. क्रांती रोठे, ॲड. राजू राम, ॲड. हेमंत चव्हाण, ॲड. आशीष सोनी, ॲड. तृप्ती बोंद्रे, ॲड. शिल्पा राम, ॲड. आनंद पवार, ॲड. सुप्रिया नाईक, ॲड. रोनक कारीरा आदी उपस्थित होते.
..............
शालेय विद्यार्थ्यांना सैन्यात अधिकारी होण्यासाठी टॅलेन्ट सर्च परीक्षा
कल्याण (वार्ताहर) : खडवली येथील भारतीय सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून मुंबई व ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांची सैन्य दलात अधिकारी होण्याचे प्रमाण वाढावे, या हेतूने रविवारी (ता. २७) सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत इयत्ता चौथी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅलेन्ट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. गणित, इंटेलिजन्स व सामान्यज्ञान हा अभ्यासक्रम आहे. या परीक्षेचा फायदा शालेय विद्यार्थ्यांना प्रज्ञाशोध, स्कॉलरशिप, ऑलिंपियाड, एन.एम.एम.एस. तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जेईई, नीट, एमपीएससी, यूपीएससी अशा सर्व स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी होणार आहे. इच्छुक पालकांनी टॅलेन्ट सर्च परीक्षेच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे कमांडंट कर्नल शंकरराव यादव (रि.) यांनी केले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २६ एप्रिलपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या टॅलेन्ट सर्च परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय सैनिकी विद्यालयातर्फे सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रथम तीन विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे, असे शाळा समिती अध्यक्षा राजेश्वरी शिंदे यांनी सांगितले.
................
चतुरंग प्रतिष्ठानचा कार्यक्रम रद्द
डोंबिवली : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे डोंबिवलीत शनिवारी (ता. २६) चैत्रपालवी संगीतोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी चतुरंग संगीत सन्मान आणि चतुरंग शिष्यवृत्ती कार्यक्रम होणार होता; परंतु पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांची अतिशय क्रूर पद्धतीने गोळ्या झाडून हत्या केली. यात डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा समावेश होता. या भ्याड हल्ल्याचा निषेध आणि पीडित कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी शनिवारी होणारा चैत्रपालवी संगीतोत्सवाचा कार्यक्रम रद्द केला आहे, असे चतुरंग प्रतिष्ठानच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नीलिमा भागवत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. चैत्रपालवी संगीतोत्सवाचा कार्यक्रम तूर्तास स्थगित केला असला तरी, हा कार्यक्रम जेव्हा निश्चित केला जाईल, त्यावेळी रसिक प्रेक्षकांना या कार्यक्रमाची स्थळ, वेळेप्रमाणे आगाऊ माहिती दिली जाईल, असे भागवत यांनी म्हटले आहे.
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.