

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : नवीन शिक्षण धोरणामुळे शिक्षणाचा ढाचा बदलला आहे. विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. नवीन आराखड्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाला लवचिकता आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी, सुकाणू समिती सदस्य प्रा. श्रीपाद ढेकणे यांनी सांगितले.
विद्याभारती कोकण प्रांत आणि श्री मावळी मंडळ, ठाणे आयोजित महाराष्ट्र राज्य शालेय ‘शिक्षण आराखडा, नवीन शिक्षण धोरण’ या विषयावर शनिवारी शिक्षण परिषद झाली. या परिषदेत नवीन शिक्षण धोरणात प्रामुख्याने ३ ते ८ वर्षे - पायाभूत स्तर, ८ ते ११ वर्षे पूर्वतयारी स्तर, ११ ते १४ वर्षे पूर्व माध्यमिक स्तर, तर १४ ते १८ वर्षे माध्यमिक स्तर यांचा समावेश आहे. या शिक्षणात कृतीयुक्त शिक्षणावर भर देण्यात आला असून, प्रयोगाधारित शिक्षण, कौशल्य विकास व शोध, दप्तरमुक्त शाळा, परीक्षा पद्धतीत बदल, वैचारिक आकलनावर भर, भारतीय ज्ञान परंपरा शिकवण्यास प्राधान्य, व्यावसायिकता, उद्योगशीलता, बहुभाषिकता इत्यादींचा समावेश आहे. पायाभूत स्तरावरील शिक्षणात प्रामुख्याने भारतीय परंपरा, विचारधाराआधारित आनंदमय, मनोमय, विज्ञानमय, प्राणमय, अन्नमय असे सर्वांगीण कोष विकासाची संकल्पना आहे. हे शिक्षण अनौपचारिक, निसर्ग निगडित, अनुभवजन्य, मातृभाषा, परिसर भाषा, खेळ केंद्रबिंदू ठेवून संकल्पना आणि आकलन होण्यासाठी बालकांचा सहभाग करून घेणारे असल्याचे सुकाणू समिती सदस्य श्रीपाद ढेकणे यांनी सांगितले. तसेच शालेय शिक्षण आराखड्यात शिक्षणात खूप गोष्टी नव्याने आणल्या आहेत. त्यामुळे कोणत्या उद्दिष्टांनी आराखडा आणला आहे याचा विचार झाला पाहिजे, असेही ते म्हणाले. या वेळी राष्ट्रीय सुकाणू समिती सदस्य शेषाद्री डांगे, विद्या भारती कोकण प्रांत मंत्री, मुख्याध्यापक संतोष भणगे, मावळी मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर मोरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. नरेंद्र पाठक, विद्या भारती कोकण प्रांतचे प्रदीप पराडकर तसेच मुख्याध्यापक उत्तम कांबळे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.