आठवडाभराने दुरुस्ती काम पूर्ण
मनोर, ता. २७ (बातमीदार) : वसई विरार महापालिकेच्या १०० एमएलडी क्षमतेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम एक आठवड्यानंतर पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने पालघर ग्रामीण भागातील गृहिणींच्या डोक्यावरून हंडा उतरला. दहिसरमध्ये झालेल्या दुरुस्तीच्या कामानंतर आठवडाभरात वसई तालुक्यातील खानिवडे गावच्या हद्दीत जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा १० दिवस बंद झाला होता. सलग आठ दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याने पालघरच्या ग्रामीण भागात गृहिणींना पाण्यासाठी वणवण करावी लागली होती.
१६ एप्रिलला सकाळी खानिवडे गावाच्या हद्दीत जलवाहिनी फुटल्याने योजनेचा १०० एमएलडी पाणीपुरवठा बंद झाला होता. जलवाहिनीमधून उपलब्ध होत असलेल्या शुद्ध पाण्यामुळे ग्रामीण भागात पाण्याच्या पारंपरिक स्रोतांकडे दुर्लक्ष झाले आहे. जलवाहिनीमधून मिळणारे पाणी बंद झाल्याने दैनंदिन वापरासाठी पाणी मिळवताना महिलांसह ग्रामस्थांची दमछाक झाली होती. पाण्यासाठी महिलांना हंडा डोक्यावर घेऊन सुस्थितीत असलेल्या विहिरींसह अन्य स्रोतांचा शोध घ्यावा लागत होता.
वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी खानिवडे गावात फुटल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. मोठ्या प्रमाणात माती भराव असल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पोकलेन मशीनच्या साह्याने ३० फूट खोदकाम करण्यात आले. तीन दिवसांनी जलवाहिनीतील फुटलेल्या सिमेंट काँक्रीटच्या पाइपजवळ पोकलेन मशीन पोहोचली. मशीनच्या साह्याने पाइप फोडून बाहेर काढण्यात आला. या ठिकाणी लोखंडी पाइप जोडून वेल्डिंग मशीनच्या साह्याने जोडणी करण्यात आली. जोडणी केलेल्या पाइपच्या ठिकाणी बुधवारी (ता. २३) सायंकाळी सिमेंट काँक्रीट टाकून पाइप सुरक्षित करण्यात आला. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाला एक आठवड्याचा कालावधी लागला.
बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मसवण पम्पिंग स्टेशनवरून पाण्याची पम्पिंग सुरू करण्यात आले होते. ग्रामीण भागात पाणी गुरुवारी (ता. २४) पाणी पोहोचले, परंतु पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी शुक्रवार (ता. २५) उजाडला. २० वर्षांपूर्वी टाकलेल्या लोखंडी जलवाहिनीची क्षमता कमी झाल्याने वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाणीपुरवठा प्रभावित होत असल्यामुळे जुने पाइप काढून उच्च क्षमतेचे लोखंडी पाइप टाकण्याची मागणी जोर धरत आहे.
आठवड्यात दोन वेळा जलवाहिनी फुटली
१२ एप्रिलला वसई विरार महापालिकेची १०० एमएलडी क्षमतेची जुनी जलवाहिनी दहिसर तर्फे मनोर गावच्या हद्दीत फुटली होती. सहा ते सात तासांच्या दुरुस्तीच्या कामानंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी २४ तास लागले होते. १६ एप्रिलला फुटलेल्या जुन्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एक आठवडा लागला होता.
या गावांतील नागरिकांचे हाल
आठवडाभर पाणीपुरवठा बंद असल्यामुळे लग्नसराई आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर परिणाम झाला होता. पाणी मिळवण्यासाठी यजमानांना धावपळ करण्याची वेळ आली होती. पालघर तालुक्यातील धुकटन, बहाडोली, दहिसर तर्फे मनोर, साखरे, नावझे, गुंदावे, वरई ढेकाळे आणि गांजे गावांमध्ये पाणीबाणी निर्माण झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.