आरोग्य परिषदेचा ग्रामीण भागातील महिलांना लाभ

आरोग्य परिषदेचा ग्रामीण भागातील महिलांना लाभ

Published on

मनोर, ता. २८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात मोठे रुग्णालय नसल्याने येथील गरिबांना गुजरात राज्यात जाऊन उपचार घ्यावे लागतात, ही सरकारची उदासीनता आहे. ज्या जंगली झाडापाल्याचा उपयोग आदिवासी औषध म्हणून वापरायचे ती जंगलेच आता नष्ट होत आहेत, यासाठी आम्ही अनेक आंदोलने आणि मोर्चे काढले; परंतु सरकार विनाशकारी प्रकल्प लादून जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचे मत मधु धोडी यांनी व्यक्त केले. आरोग्यासारख्या विषयावर पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्यात परिषद घेतल्याने येथील महिलांना याचा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.

तीनदिवसीय नववी महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषदेचा उद्‍घाटन सोहळा शनिवारी (ता. २६) पालघर तालुक्यातील चहाडे येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. इंदवी तुळपुळे, आरोग्य हक्क परिषदेच्या मनीषा गुप्ते, स्त्री मुक्ती चळवळीच्या मार्गदर्शक छाया दातार, मासवण सरपंच दर्शना जाधव, चहाडे सरपंच विष्णू जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी कष्टकरी संघटनेच्या मधु धोडी या अध्यक्षीय भाषणावेळी बोलत होत्या. परिषदेत राज्यभरातून आलेल्या चारशे महिलांनी सहभाग नोंदवला. आदिवासी तारपा नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

मनीषा गुप्ते यांनी आजपर्यंत राज्यातील विविध भागात झालेल्या आठ परिषदांचा थोडक्यात ऊहापोह केला. तसेच परिषदेला आंतरराष्ट्रीय ते राज्यपातळीवर झालेल्या सुरुवातीबाबत माहिती दिली. तसेच पालघरमधील परिषदेतून महिला आरोग्य हक्कासंदर्भात वेगवेगळ्या विषयांवरील मार्गदर्शनाबाबत खात्री दिली. छाया दातार यांनी तुळजापूर येथे झालेल्या आठव्या आरोग्य हक्क परिषदेच्या अहवालाचे प्रकाशन केले.

मानवी आरोग्यावर परिणाम
इंदवी तुळपुळे यांनी विविध उदाहरणे देऊन देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या ऱ्हासामुळे मानवांच्याच आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले. आज वेगवेगळे प्रकल्प आणताना लोकांना विचारले जात नाही. लोकांचा विरोध डावलून विनाशकारी प्रकल्प जनतेवर लादले जात आहेत. यासाठी महिलांनी आपली ताकद वाढवली पाहिजे. नैसर्गिक साधनसंपत्ती जगली तर आपले आरोग्य जपले जाईल, असा संदेश त्यांनी महिलांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com