आपत्तीकाळासाठी पालिका सज्ज
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : मॉन्सून काही दिवसांवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरात विविध प्राधिकरणामार्फत तसेच ठाणे महापालिकेच्या वतीने सुरू असलेली सर्व विकासकामे २० मेपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी यंत्रणांना दिले आहेत. तसेच पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास एकमेकांवर केलेले आरोप खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी मॉन्सूनपूर्व कामांचा तसेच मॉन्सून कालावधीत करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सर्व प्राधिकरणांची बैठक घेतली. या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, पोलिस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीएचे अधिकारी, मेट्रो, महावितरण, महानगर गॅस, रेल्वे आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मॉन्सून कालावधीत सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच भरतीच्या वेळांवर लक्ष ठेवून ज्या दिवशी जास्त उंचीच्या लाटा असतील, त्या दिवशी आवश्यक उपाययोजनांसह यंत्रणांनी सज्ज राहावे. सर्व विभागांचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. एमएमआरडीएने सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी, खड्डे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे निर्देश दिले.
-------------------------------------------
रेल्वेच्या हद्दीतील कामे
मेट्रोच्या कामासाठी उभारलेले लोखंडी बॅरीगेट्स जमिनीपासून वर उचलावेत तसेच कळवा ते माजिवडापर्यंतचा रस्ता मे अखेरपर्यत पूर्ण करावा. खारीगाव टोलनाका येथील रस्त्यावर मास्टीकचे काम निविदा काढून पूर्ण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले. रेल्वेच्या हद्दीत असलेले अंतर्गत नाले कलव्हर्टची साफसफाई करून घ्यावी. तसेच कलव्हर्ट नियमित स्वच्छ होतील, या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. रेल्वेच्या हद्दीतील कामांबाबत महापालिका, रेल्वेच्या अभियंत्यांनी एकत्रित पाहणी करताना तातडीने सर्व कामे करावीत, असे निर्देश दिले.
.........................................
आयुक्तांचे निर्देश ः
- ठाणे शहरातील बेवारस वाहने उचलण्याची कार्यवाही प्रादेशिक परिवहन विभागाने करावी. यासाठी कॅम्प लावून लिलावाची प्रक्रिया करा.
- नालेसफाईच्या कामांच्या ठिकाणी एमएसईबीच्या केबल्समुळे अडचणी येत आहेत. अशा केबल्स तातडीने हटवा.
- महापालिका कार्यक्षेत्रातील धोकादायक झाडे व झाडांच्या फांद्या छाटणीचे काम ३० मेपर्यंत पूर्ण करून हरित कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी.
- पावसाळ्यात वाहतूक कोंडी होणार नाही, या दृष्टीने वाहतूक विभागाने समन्वय अधिकारी नेमावेत.
- रोड क्रमांक २२ रस्ता येथे कलव्हर्टचे काम अपूर्ण असून, या कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करा.
- चिरागनगर कॅडबरी जंक्शन येथे सुरू असलेली कामेदेखील युद्धपातळीवर पूर्ण करावीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.