महिला कर्मचारी आठच्या आत घरात!
माणगाव, ता. ६ (बातमीदार) ः एसटी कर्मचारी हा राज्य परिवहन मंडळाचा कणा आहे. मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांनीच एसटीने प्रवास केला आहे. त्यामुळे सर्वांनाच एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी ज्ञात आहेत. महिला कर्मचाऱ्यांसाठी यापुढे रात्रपाळीची सेवा नसेल. रात्री आठच्या आत त्यांचे काम संपेल. पुढील पाच वर्षांत नवीन २० ते २५ हजार बस मिळतील. ६५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. त्यांची जबाबदारी फक्त एक लाख कर्मचाऱ्यांवर आहे. हे सरकार एसटी कामगारांच्या पाठीशी आहे. लवकरच बैठक घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न व विविध मागण्या मार्गी लागतील, अशी ग्वाही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे ५७ वे दोनदिवसीय महाअधिवेशन माणगाव येथे अल्ताफ धनसे मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सोमवारी अधिवेशनास उद्योगमंत्री उदय सामंत, रायगडचे खासदार सुनील तटकरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासह उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, एसटी कामगार संघटनेचे महासचिव हनुमंत ताटे, संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संदीप शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, रायगड जिल्हा अध्यक्ष विलास खोपटे, विभागीय सचिव गणेश शेलार, युवासेना जिल्हाध्यक्ष विपुल उभारे, सायली दळवी आदी उपस्थित होते.
राज्य सरकारला एसटीचे महत्त्व माहीत असून, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी अधिवेशनात व्हिडिओ व फोनद्वारे तुमच्यावर अन्याय होणार नाही, असा शब्द दिला आहे. एसटी व बसस्थानके सुस्थितीत राहणे गरजेचे असून, त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असा विश्वास या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट सहा हजार ५०० रुपयांनी पगारात वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पहिले वातानुकूलित चालक विश्रामगृह रत्नागिरीमध्ये होत असून, याच ठिकाणी अत्याधुनिक सेवा-सुविधांयुक्त बसस्थानक उभारले आहे. याशिवाय बसचालक-वाहकांसाठीही वातानुकूलित कक्ष उभारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हिरकणी कक्षही वातानुकूलित करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बसस्थानक अत्याधुनिक केले असून, रत्नागिरी मॉडेल राज्यभरात राबवण्यात असल्याचेही सामंत यांनी या वेळी स्पष्ट केले. प्रास्ताविकात संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे म्हणाले, कामगार कराराच्या तरतुदीनुसार एसटी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढीचा दर लागू करण्याचे मान्य केले असतानाही २०१८ पासून महागाई भत्त्याची थकबाकी प्रलंबित आहे. औद्योगिक न्यायालय मुंबई यांनी थकबाकी देण्याबाबतचा निर्णय देऊनही सरकारकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. आता सरकारी कर्मचाऱ्यांकरिता जुलै २०२४ पासून महागाई भत्त्याचा दर ५३ टक्के लागू करण्यात आला आहे. हा महागाई भत्ता थकबाकीसह फेब्रुवारी व मार्च २०२५ च्या वेतनात देण्यात आला आहे, मात्र एसटी कामगारांना महागाई भत्ता अद्याप ४६ टक्के दिला जात आहे. एसटी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे. भविष्य निर्वाह निधीची उचल वेळेवर मिळावी, जाचक शिस्त व आवेदन कार्य पद्धती रद्द करा, प्रवासी भाडेवाढीची अंमलबजावणी करताना रुपये एकच्या पटीत केली आहे, ती पूर्वीप्रमाणेच रुपये पाचच्या पटीत लागू करावी. आरटीओ विभागाकडून दंडात्मक कारवाई करताना वाहनांच्या दोष, त्रुटींमुळे चालकावर होणारी दंडात्मक रकमेची वसुली कामगारांकडून करू नये आदी प्रलंबित मागण्यांचा ताटे यांनी पुनरुच्चार केला.
सुरक्षित प्रवासासाठी एसटी एकमेव पर्याय
एसटी महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एसटीचा विस्तार व व्याप्ती वाढली आहे. एसटीने फक्त गाव, वाड्या जोडल्या नाहीत, तर सर्वसामान्यांच्या मनाला जोडण्याचे काम केले आहे. महायुती सरकारने एसटी कामगारांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे एसटी कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत दिली.
रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा एसटी महामंडळाचे राज्य अधिवेशन होत आहे. आगामी काळात होणाऱ्या अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही मागण्या प्रलंबित राहणार नाहीत. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्यावर एसटीची स्थापना झाली असून, खेड्यातील नागरिकांना उत्तम आरामदायी सेवा देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली. महायुती सरकार एसटी कर्मचाऱ्यांबरोबरच आहे.
- खासदार सुनील तटकरे
शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक रायगड जिल्ह्यात हे अधिवेशन पार पडत आहे. एसटी कर्मचारी अहोरात्र मेहनत करीत सेवा देत आहेत. त्यांच्या मागण्या रास्त असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने त्या मार्गी लागतील. माणगाव आगारासाठीही लवकरच नवीन बस उपलब्ध करून घ्याव्यात, अशी मागणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
- भरत गोगावले, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.