अवकाळी पावसाने दाणादाण

अवकाळी पावसाने दाणादाण

Published on

पालघर, ता. ७ (बातमीदार) : जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह मंगळवारी (ता. ६) रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या अवकाळीमुळे शेतकरी, मच्छीमार, वीटभट्टी आणि गवत व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ७६७ घरांचे नुकसान झाले असून, ५० मच्छीमार बोटींची हानी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे. दुर्गम भागातील नुकसानीचे आकडे अजूनही प्राप्त होत असल्याचे सांगण्यात आले.

वादळी वाऱ्यामुळे डहाणूमध्ये ५०, तर पालघरजवळील वडराई येथील एका बोटीचे नुकसान झाले. घरांच्या परझडीत अनेकांच्या छपराचे पत्रे व भिंती कोसळल्या आहेत. केळवे येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून शेजारच्या घरावर कोसळली. त्यामुळे त्या घराचे पत्रे फुटले. त्याचबरोबर गॅलरीही तुटून पडली, तर सफाळेजवळील टेंभी, खोडावे, आगरवाडी, चटाळे, केळवे-माहीम या गावांतील अनेक घरांचे पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सातपाटी बंदरात मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी रात्री उशिरापर्यंत किनाऱ्यावर पोहोचल्या आहेत, मात्र सुकत टाकलेली मच्छी भिजल्याने मोठे नुकसान झाले. किनाऱ्यावरील अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. केळवे-सफाळे परिसरात जल जीवन योजनेचे काम सुरू आहे. यासाठी बहुसंख्य मजूर बाहेरगावाहून आले आहेत. त्यांनी आपला संसार उघड्यावरच मांडला होता. रात्रीच्या अवकाळी पावसामुळे या मजुरांचे अन्नधान्य, कपडे भिजले. त्यांच्या निवाऱ्याची कुठेही सोय नसल्याने त्यांना रात्र पावसातच भिजत काढावी लागली. केळवे सरपंच संदीप किनी यांनी केळवे परिसरातील समाज मंदिरांमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करून दिली, मात्र लहान मुलांचे खूप हाल झाले.

आंबा बागायतदारांचे नुकसान
पालघरच्या पूर्वपट्टीत वीटभट्टींवर काम जोरात सुरू होते. अशातच पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर पिकण्यासाठी आलेला आंबा गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. केळवे-माहीम, शिरगाव, सातपाटी, नांदगाव व पालघरच्या पूर्व भागामध्ये आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले.

विजेअभावी ग्राहक अंधारात
वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळून पडले आहेत. महावितरणच्या खांबावर फांद्या पडल्यामुळे अनेक गावांमधील पुरवठा खंडित झाला आहे. महावितरणकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

सफाळे-केळवे परिसरातील गावामधील घरांचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर आंबा बागायतदार व इतर शेतकरी, मच्छीमारांचेही मोठे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसानीचा पंचनामा करून संबंधितांना भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.
- संदीप किनी, सरपंच, केळवे ग्रामपंचायत

पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. डहाणू किनारपट्टीवरील ५० बोटींचे नुकसान झाले आहे. सुकी मासळी भिजल्याने मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणेच भरपाई मिळावी, अशी आमची मागणी होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली.
- रामकृष्ण तांडेल, अध्यक्ष,
अखिल भारतीय मच्छीमार महासंघ

अवकाळीमुळे घरांचे नुकसान
वाडा ९२
वसई २९
जव्हार ८९
मोखाडा ८७
पालघर ८५
विक्रमगड ९२
डहाणू २३०
तलासरी ६३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com