ठाण्याला अवकाळीचा तडाखा
ठाण्याला अवकाळीचा तडाखा
पालिका क्षेत्रात ३२ झाडे उन्मळून पडली; २२ मिमी पावसाची नोंद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : शहरात मंगळवारी (ता. ६) रात्री अचानक पावसाने हजेरी लावली. तत्पूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ठाणे शहरात १३ झाडे पडली. तर बुधवारी (ता. ७) सकाळपासून दुपारपर्यंत तब्बल १९ झाडे पडल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. झाडे पडण्याबरोबरच ठाणे शहरात विविध तक्रारींचाही अक्षरशः पाऊस पडल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. पाऊस सुरू झाल्यापासून बुधवारी दुपारी वाजेपर्यंत एकूण ५१ तक्रारींची नोंद झाली आहे. यामध्ये पाणी साचल्याचा तीन तक्रारींचा समावेश आहे. तर मंगळवारी रात्री पाऊण तासात २० मिमी तर बुधवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत २२ मिमी अवकाळी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच बुधवारी दिवसभर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
मंगळवारी सायंकाळी ढगाळ वातावरण होते. त्यातच अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. याचदरम्यान ठाणे शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांचे हाल झाले. त्यातच ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा फोनही खणखणत होता. रात्री पावणेदहा वाजल्यापासून सव्वाअकरा वाजेपर्यंत झाड पडले, फांदी तुटून पडली, शेड उडाली आणि अन्य तक्रारींचे फोन आले. यामध्ये सर्वाधिक १३ झाडे पडल्याच्या तक्रारी आहेत. तर एक फांदी पडल्याची एका ठिकाणी फायबर शेड उडाल्याची तक्रार आहे. अन्य चार तक्रारी आहेत. बुधवारी सकाळपासून वातावरणात गारवा पसरला होता आणि पावसानेही हजेरी लावली होती. दिवसभर थांबून पाऊस येत- जात होता. जून-जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसाची आठवण मे महिन्यातच ठाणेकर नागरिकांना आली.
सकाळपासून दुपारपर्यंत तब्बल ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष ३२ तक्रारी नोंदवल्या गेल्या. यामध्ये सर्वाधिक झाडे पडल्याच्या १९ तक्रारींचा समावेश आहे. त्या खालोखाल सहा फांद्या तुटून पडल्याच्या तक्रारी असून तीन ठिकाणी पाणी तुंबल्याच्या तक्रारी आहेत. एका ठिकाणी संरक्षण भिंत पडली असून दोन ठिकाणी मेटल शेड उडाल्याच्या तक्रारी आहेत. तर एक अन्य साधारण तक्रार दुपारी दोन वाजेपर्यंत नोंदवली गेली आहे. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पावसाची जोरदार हजेरी लावल्याने वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला होता.
या ठिकाणी तुंबले पाणी
बुधवारी सकाळी झालेल्या पावसामुळे घोडबंदर रोडवरील आर मॉल, जेल तलाव येथील सिद्धी (पोलिस) हॉल आणि मानपाडा, टिकुजिनीवाडी या परिसरात पाणी तुंबले होते. तर पावसाचा जोर कमी झाल्यावर पाण्याचा निचरा झाला. कळव्यात दोन ठिकाणी मेडल शेड उडाली असून यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
३२ ठिकाणी उन्मळून पडले वृक्ष
मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दुपारपर्यंत ३२ ठिकाणी झाडे पडली आहेत. यामध्ये चरई गणपती मंदिराजवळ, पवारनगर बसथांब्याच्या बाजूला, गणेशवाडी तुळजाभवानी मंदिरासमोर, एन.के.टी. कॉलेजसमोर, नौपाडा दमानी इस्टेटजवळ, वागळे इस्टेट हिरामोती सोसायटी, ज्ञानसाधना कॉलेजजवळ, राम मारुती रोड, तीन हात नाका, खारकरआळी, साईनाथनगर - माजिवडा, ढोकाळी नाका नंदीबाबा मंदिराजवळ आदी ठिकाणी झाडे पडली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.