भर पावसातही फवारणीचा हट्ट

भर पावसातही फवारणीचा हट्ट

Published on

उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : पावसाने आधीच भिजलेल्या रस्त्यांवर उल्हासनगर महापालिकेची ‘स्प्रे व्हॅन’ पाण्याची फवारणी करताना दिसली. ‘हे फक्त उल्हासनगर शहरातच घडू शकते...!’ या टॅगलाईनखाली समाज माध्यमांवर हास्याची लाट उसळली. हा कारभार कार्यक्षमतेचा नमुना की शासकीय बेजबाबदारीचा तमाशा? अशी चर्चा शहरात सुरू आहे. उल्हासनगर महापालिकेच्या या भरपावसातील ‘स्प्रे ड्रामा’ने समाज माध्यमांवर टीकेचा भडीमार सुरू आहे.

उल्हासनगर शहरात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. एकीकडे रस्ते पावसाच्या पाण्याने भरलेले असताना, दुसरीकडे उल्हासनगर महापालिकेची धूळ नियंत्रणासाठीची ‘स्प्रे व्हॅन’ शहरभर फिरून फवारे मारताना दिसून आली. या अजब दृश्याने नागरिक अचंबित झाले. या व्हॅनचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होऊन टीकेचा धनी ठरत आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत शहरात विविध ठिकाणी भुयारी गटारे आणि सांडपाणी वाहिनी टाकण्याच्या कामासाठी रस्ते खोदले गेले आहेत. त्यामुळे धुळीचा त्रास नागरिकांना होऊ नये, यासाठी पाण्याची फवारणी करणारी ‘स्प्रे व्हॅन’ नेमून देण्यात आली आहे. मात्र, जेव्हा शहरातच जोरदार पाऊस सुरू होता आणि रस्ते आधीच पाण्याने भरलेले होते, तेव्हा अशा स्थितीतही पाण्याचे फवारे मारणे ही एक ‘बिनडोक कार्यपद्धती’ मानली जात आहे. नागरिकांच्या मते, जेव्हा शहरात डेंगी, मलेरिया, घाण व दुर्गंधी यांसारख्या समस्यांमुळे फवारणीची खरी गरज असते, तेव्हा महापालिकेची तत्परता कुठे दिसत नाही. पण, जेव्हा नैसर्गिकरित्या रस्ते आधीच पाण्याने न्हालेले असतात, तेव्हा मात्र ‘स्प्रे व्हॅन’ भरधाव शहरात फिरते.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे. यासोबतच शहरातील सार्वजनिक निधीचा वापर योग्य प्रकारे होतोय का, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


समाज माध्यमांवर टोला
याचे नागरिकांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून समाज माध्यमांवर टाकल्यावर काही तासांतच ही घटना चर्चेचा विषय बनली. ‘हे नेमकं कोणासाठी?’ असा प्रश्न अनेकांनी विचारला.
काहींनी म्हटले, ‘उल्हासनगर महापालिका रस्त्यावर धूळ पाहून नव्हे, तर वेळापत्रक पाहून काम करते’. काहींनी टोला लगावत म्हटले, ‘पावसावरही विश्वास नाही, म्हणून महापालिका पाणी मारत आहे’. एका नागरिकाने लिहिले, ‘महापालिकेचा ‘बुद्धीप्रदूषण स्प्रे’ आहे का हा?’, तर दुसऱ्याने म्हटले, ‘जिथे गरज नाही तिथे फवारणी, जिथे गरज आहे तिथे नाही - हाच का विकासाचा नवा मॉडेल?’

शासकीय कामगिरी की दिखावा?
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. अनेकांनी महापालिकेवर ‘खानापुर्तीचे’ आरोप लावले आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, हे काम केवळ अहवालात दाखवण्यासाठी करण्यात आले असून, यामागे कोणतेही वास्तविक नियोजन नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com