जलवाहिन्यांसाठी रस्त्यांचे खोदकाम
जलवाहिन्यांसाठी रस्त्यांचे खोदकाम;
नागरिकांची गैरसोय
कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : अटाळी पंपहाउसकडे जाणारा मुख्य रस्ता, वडवली मुख्य रस्ता व आंबिवली रेल्वेस्थानक बाजारपेठ रस्त्यावर पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केले होते; मात्र त्यावर खडीकरण व डांबरीकरण न केल्यामुळे पादचारी व वाहनचालकांची गैरसोय होत आहे. दुचाकीवरून लोक पडत आहेत. तसेच पावसाळ्यात आणखी वाईट अवस्था होऊ शकते, याकडे आरपीआयचे भिवंडी लोकसभा सोशल मीडिया आयटी सेल प्रमुख दीपक संकपाळ यांनी लक्ष वेधले आहे.
वडवली उड्डाणपूल ते अटाळी रेल्वे गेट क्र. ४८ दरम्यानचा रस्ता काही महिन्यांपूर्वी नगरसेवक दुर्योधन पाटील व हर्षाली थविल यांच्या पाठपुराव्याने नव्याने तयार करण्यात आला होता. या रस्त्याची गुणवत्ता उत्तम असून, वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेला रस्ता पहिल्यांदाच चांगल्या प्रकारे तयार झाला होता; मात्र आता पाणीपुरवठा विभागाच्या बेजबाबदार कामामुळे तो पुन्हा खड्डेमय झाला आहे.
खोदकामादरम्यान वडवली-अटाळी-आंबिवली भागाला वीजपुरवठा करणारी केबल दोन वेळा खराब झाली. एकदा रात्री संपूर्ण परिसर अंधारात गेला आणि दुसऱ्या वेळी १० तास दिवसा वीज बंद राहिली. यामुळे व्यापारी, दुकानदार व नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. महावितरणच्या केबलचे स्थानिक नकाशे घेऊन काम न केल्याने ही परिस्थिती उद्भवली. याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चितच टाकता येईल. तसेच वार्ड ऑफिसजवळील अपूर्ण खोदकामामुळे काही दिवसांपूर्वी एका महिलेला अपघात झाला, मात्र या परिसरात अजूनही खोदलेले रस्ते तसेच खुले खड्डे असल्याने दररोज अपघात घडत आहेत.
धुळीचे साम्राज्य
परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. व्यापारी व रहिवाशांना आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर दीपक सकपाळ यांनी सांगितले की, ‘‘आम्ही लवकरच नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या जलवहिन्या टाकण्याच्या कामामुळे झालेल्या दुरवस्थेबाबत निवेदन देणार आहोत. संबंधित ठेकेदार आणि पालिकेतील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.