घनकचरा व्यवस्थापनातील खाजगीकरण रद्द करा
घनकचरा व्यवस्थापनातील खासगीकरण रद्द करा
कामगार संघटनांचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : महापालिका हद्दीत घनकचरा संकलन आणि परिवहन हे काम खासगी कंत्राटदारांना देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून, या निर्णयाला म्युनिसिपल कर्मचारी युनियनने विरोध दर्शवला आहे. महापालिकेने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरचिटणीस ॲड. नवनाथ महारनवर यांनी दिला आहे.
घनकचरा संकलन व परिवहन हे महापालिकेचे बंधनकारक व कायमस्वरूपी काम असून, हे काम करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आस्थापनेवर कायम कामगारांची पदे निर्माण करून त्यांची नेमणूक केली आहेत. घनकचरा संकलन व परिवहनाचे काम करणाऱ्या कामगारांना त्या ठिकाणाहून बदली करून हे काम ठेकेदारामार्फत कंत्राटी कामगारांकडून करून घेण्याचा महापालिका प्रशासनाने निर्णय घेऊन त्याची अंबलबजावणी करण्याचे ठरवले आहे. महापालिका प्रशासनाचा हा निर्णय चुकीचा, बेकायदेशीर, कामगारावर अन्याय करणारा आहे. औद्योगिक कलह कायदा १९४७ च्या कलम ९ (अ) मधील तरतुदीचा तसेच एमआरटीयु आणि पीयुएलपी कायदा १९७१ च्या अनुसूची ४ मधील तरतुदीचा भंग करणारा आहे असे ॲड. नवनाथ महारनवर यांनी सांगितले.
आंदोलनाचा इशारा
घनकचरा संकलन आणि परिवहनाचे काम पूर्वापार पद्धतीने महापालिका कामगारांकडूनच करून घेण्यात यावे, अशी म्युनिसिपल कर्मचारी युनियनची मागणी असल्याचे ॲड. नवनाथ महारनवर यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेऊन घनकचरा संकलन आणि परिवहनाचे काम कंत्राटदाराला दिल्यास मुंबई महापालिकेचे कामगार तीव्र आंदोलन करतील, महापालिका प्रशासनाला न्यायलयात खेचण्यास मागेपुढे पाहणार नाही, त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दुय्यम कामे करावी लागणार
या निर्णयामुळे सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मूळ जबाबदाऱ्या बदलल्या जाण्याची आणि त्यांना दुय्यम कामे सोपवली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, त्यांच्या सेवा-अटी, हक्क आणि सुविधांवर विपरीत परिणाम होणार आहे, जो पूर्णपणे अन्यायकारक आहे, अशी प्रतिक्रिया म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.