निसर्ग संरक्षणाचे प्रयत्न मातीमोल
राहुल क्षीरसागर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : कळवा खाडीजवळ दिवंगत उत्तमराव पाटील निसर्ग संरक्षण व जैवविविधता उद्यानात नक्षत्र वन, नवग्रह, पंचमहाभूत वनांच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे, पण उद्यानाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले झालेच नसल्याने परिसराला अवकळा आल्याचे चित्र आहे.
ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह आजूबाजूच्या शहरातील नागरिकांना जैवविविधतेचा अनुभव घेता यावा, यासाठी कळवा खाडीजवळ दिवंगत उत्तमराव पाटील निसर्ग संरक्षण व जैवविविधता उद्यान जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात आले. ठाणे वन परिक्षेत्राच्या सामाजिक वनीकरण विभागाने या उद्यानाची निर्मिती केली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वनस्पतींचे जतन करण्याच्या हेतून येथे विविध झाडे लावण्यात आली आहेत, पण उद्यानातील बांबूचे वन पाण्याअभावी सुकून गेले असून, केंद्राच्या गेट क्रमांक दोन व तीनची परिस्थिती अतिशय विदारक झाली आहे. उद्यानाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुलेच झाले नसल्याने उद्यानाचा ताबा खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी घेतला आहे. या उद्यानाची संरक्षक जाळी तुटलेली असून, भंगाराने भरलेल्या गोण्या, प्रवेशद्वारावर वाळत घातलेले कपडे असे विदारक चित्र येथे आहे. याबाबत ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
---------------------------------------------
२०२४ मध्ये जिल्हा परिषदेकडे हस्तांतर
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवग्रहांचे प्रतिनिधित्व करणारे वृक्ष, नक्षत्र आणि राशीनुसार वृक्षांची लागवड, फुलपाखरू उद्यान, निसर्ग माहिती केंद्र, ध्यानधारणा केंद्र असे विविध प्रकल्प राबवण्यात आले आहेत. तसेच बालोद्यान, फुलपाखरू उद्यान आकर्षण आहे. तसेच झाडांची लागवड करून त्याची माहिती तसेच महत्त्वही विशद करण्यात आले आहे. या उद्यानाचे हस्तांतर सामाजिक वनीकरण विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मे २०२४ ला करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी महसूल विभागाकडे आहे.
....................................
जैवविविधता पाहण्याची संधी
साकेत मैदानाजवळील रस्त्यालगतच वन विभागामार्फत उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. ५.२६ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या उद्यानासाठी सात कोटी रुपये खर्च करण्यात होता. बालोद्यान, फुलपाखरू उद्यान केंद्रात तयार करण्यात आले होते. स्थानिक वन प्रजाती, पक्षी, औषधी वनस्पतींची शास्त्रीय नावांची ओळख पर्यटकांना व्हावी, यासाठी उद्यानात निसर्ग माहिती केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. उद्यानात जैवविविधतेची वाढ होण्यासाठी फुलपाखरू उद्यानात वड, पिंपळ, बेल, आंबा, जांभूळ, आवळा वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
...................
ध्यानधारणा केंद्र धूळखात
नागरिकांना ताणतणावापासून मुक्ती आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालविण्यासाठी उद्यानात पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून वयोवृद्ध नागरिक, महिलांसाठी ध्यानधारणा केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे, पण दुर्लक्षामुळे हे केंद्र धूळखात पडले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.