उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीने नागरिक भयभीत
अंबरनाथ, ता. ८ (वार्ताहर) : उल्हास नदीमुळे वारंवार बदलापुरात पूरस्थिती निर्माण होते. नदीच्या पात्रात अतिक्रमण होत असल्यामुळे पूर येऊन किनारी असलेल्या सोसायट्यामध्ये पाणी शिरते. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान तर होतेच; मात्र जीवितहानी होण्याचीही दाट शक्यता आहे. वारंवार उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीने पूरग्रस्त, भयभीत नागरिकांनी तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात नदीपात्रातील अतिक्रमण हटवण्यात यावे; तसेच सत्संग विहार संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
उल्हास नदीमुळे बदलापूरमध्ये पाच ते सहा वर्षांपासून सतत पूरस्थिती निर्माण होते. पश्चिमेकडील हेंद्रपाडा परिसर आणि आसपासच्या सोसायटीत पुराचे पाणी शिरत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होतात. तर प्रचंड आर्थिक नुकसानही होते. असे असताना उल्हास नदीमध्ये सत्संग विहार संस्थेने भराव टाकून नदीच्या मूळ प्रवाहात अडथळा निर्माण केला. त्यामुळे दरवर्षी जुलैमध्ये येणारा पूर यंदाच्या मे महिन्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसातच येतो का? अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली. यासाठी भयभीत झालेल्या नागरिकांनी तहसीलदार अमित पुरी यांची भेट घेत निवेदन दिले आहे. या निवेदनात नागरिकांनी सत्संग विहार संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा; तसेच तत्काळ कारवाई करत उल्हास नदीतील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. नदीपात्रात होणाऱ्या अतिक्रमणसंदर्भात सह्यांची मोहीम राबवून जनजागृती करण्यात आली होती. या मोहिमेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
बदलापुरात कुठेही पूरस्थिती नसतानाही आमच्या येथे मात्र असते. दरवर्षी तळमजल्यावर असणारे पुराचे पाणी यंदा पहिल्या मजल्यावर येईल, अशी भीती निर्माण झाली आहे. सत्संग विहार संस्थेने केलेल्या भरणीमुळे पाच फुटांपर्यंत येणारे पाणी यंदा १५ फुटांपर्यंत येण्याची शक्यता आहे. आम्ही सामान आताच अवकाळी पावसाच्या भीतीने बांधून ठेवले आहे. यासंदर्भात तहसीलदारांनी पाटबंधारा खात्याला पत्रव्यवहार केल्याची माहिती दिली. लवकरच हा भराव काढण्यात येईल, असे आश्वासनही दिले आहे.
- अनिल जोशी, स्थानिक नागरिक
दरवर्षी तळमजल्यावर येणारे पुराचे पाणी यंदा सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर येण्याची भीती आहे. सत्संग विहार संस्थेने कोणाचीही परवानगी न घेताच ही भरणी केली आहे. मात्र, तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. आम्ही याचा महिनाभरापासून पाठपुरावा करत आहोत. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन आम्हाला भयमुक्त करावे.
- तुषार अहिरे, स्थानिक नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.